मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
पाउस वर पडतो , अरे रात्र ...

लावणी - पाउस वर पडतो , अरे रात्र ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


पाउस वर पडतो, अरे रात्र सख्या अंधारी ।

भिजत मज साठी तू उभा केव्हांचा द्वारी ॥ध्रु०॥

कुठुन तशी केला, स्नेह संग सख्या पहिल्याने ।

होसी नित वेडा न्यहाळुन मला पहाल्याने ॥

मी सासुरवासी, आब जाईल उघड हसल्याने ।

होइल जनी चर्चा, एकांति आपण बसल्याने ॥

किती पुसु डोळे, धावधावुन तुझे शेल्याने ।

सांडकर माझी, दोन दिवस स्वस्थ निजल्याने ॥चाल॥

भिंतीआड माझ्या नांदतो हकिम शेजारी ।

तशांमधि झाली अनकुळ घरातिल सारी ॥१॥

प्राणप्रियकरणी, तुझे स्वरुप येउन ध्यानात ।

दोनी कर धरुनी घालितो विडा वदनात ॥

जवळ जसी बसलिस, श्रृंगर करुन सदनात ।

मिठि गळा मारून, गोवितेस बरे वचनात ॥

अशी पडे दृष्टी, गोजरि मूर्त सदनात ।

जागेपणी पहाता एकटाचि मी मंदिरात ॥चाल॥

रत्‍न तुज ऐसे, कसे दुरावले संसारी ।

अशी काय केली ईश्वरा तुझ्या घरि चोरी ॥२॥

नका होउ कष्टी, अहो प्राणसख्या प्रियपात्रा ।

वचन कुठे टळता, जिभ शेंड्यापुन कात्रा ।

फकिरिण होउन मी, करिन तुम्हांसवे यात्रा ।

जित्या अन मेल्या, द्यामति कोमळगात्रा ॥

पराव्या पुरुषासी, अधी संगत सोमलमात्रा ।

करू नये केली, घ्या बहार सारी रात्रा ॥चाल॥

माझि मी राजी, जहाले तुला रे निरधारी ।

मनापुन भोगा, हवी तशी नेउन मंदीरी ॥३॥

आम्ही तर दर्दी, इष्काचे भुकेले प्राणी ।

शेवट कर सखये, तू आहेस गुणांची खाणी ॥

मनी नये आणू, संशय भयाचा कोणी ।

शिर जरी गेले, तरी द्यावे सोड घे पाणी ॥

तुशी स्नेह कैसा, मोहोरांची लाधली गोणी ।

ईश्वरे दिधली, रूपवान अम्हाशी राणी ॥चाल॥

गंगु हैबती, शाहिर पुण्याचे भारी ।

महादेव गाती, म्हणे ऐक प्रभाकर नारी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP