मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
भर महिना लोटेना चुकेना अज...

लावणी - भर महिना लोटेना चुकेना अज...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


भर महिना लोटेना चुकेना अजुन बाई पाळी ।

कधि ग होइन लेकुरवाळी ॥धृ०॥

घरंदाज कुळ शुद्ध प्रथम वर सुरूप पैकेपुर ॥

राजमान्य साहेब सुभेसरदार स्वता रणशुर ॥

परोपकारी रामउपासक लौकिक ज्यांचा दुर ॥चा०॥

अति योग्य असे मुळी पित्याने स्थळ शोधिले ॥

पाहुन घटित ठीक मज पदरी बांधिले ॥

फार फार पतीला बहुल्यावर बोधिले ॥चा०॥

केला चार दिवस सोहळा ॥

पुरला त्यांचा डोहळा ॥

जावई तो धन कोहळा ॥चा०॥

उतराई माझी मायबाप आपुण जाहली ॥

सोशिते दुःख मी हिकडे ती दूर राहिली ॥

करमेना मुलाविण सुनि दिसते माहली ॥चा०॥

गडे काय कपाळाला करू ॥

नाहि घरात एक लेकरू ॥

चोपले खंत करकरू ॥चा०॥

देह झिजला झुरझुरून घालिते नित जीव जंजाळी ॥१॥

तर्‍हेतर्‍हेचे उपाय जे जे कुणी काही सांगितले ॥

सर्व करून ते मान्य अनुग्रह साधुन किती घेतले ॥

विपुल धन देऊन तपाला पवित्र भट घातले ॥चा०॥

ऐकते परस्पर कठीण बद्रिकाश्रम ॥

पडे बर्फ तिथे ग कामनिक करती श्रम ॥

धर्मार्थ बसविले काशीस मठ आश्रम ॥चा०॥

उज्जनीमहंकाळ तो ॥ आले संकट त्वरे टाळतो ॥

का वृथैव मज जाळतो ॥चा०॥

धावण्या धाव ओंकार ममळेश्वरा ॥

नवशिले नवस वेरुळच्या घृष्णेश्वरा ॥

कधी हौस पुरवशिल सोरटी सोमेश्वरा ॥चा०॥

अरे नागनाथ आंवढ्या ॥ वासना मनी जेवढ्या ॥

तू तडिस ने तेवढ्या ॥चा०॥

आराधना केवढ्या मांडिल्या जपून तिन्ही काळी ॥२॥

वैजनाथ परळिचा चंद्रशेखर तो शिव आठवा ॥

भरून भागिरथीच्या कावडी रामेश्वरी पाठवा ॥

तिळ तांदुळ गहू तेल मलकार्जुनी नेउन साठवा ॥चा०॥

कर कृपा गौरिवल्लभा भिमाशंकरा ।

जा जा हो त्रिंबकेश्वरी कुणी सेवा करा ॥

नित प्रदक्षिणा सांगते अकरी अकरा ॥चा०॥

अग सप्तशृंगवासिनी ॥ पहावरद विघ्ननाशनी ॥

आला राशिस नकळे शनी ॥चा०॥

लाजविती मला बोलण्यात गरोदर स्त्रिया ॥

कोणती सुफल होइना आरंभिली क्रिया ॥

सांगता नये खुण कुठवर चोरू प्रिया ॥चा०॥

गळ टोचिनरे हैबती । वाहीन साहेब नौबती ॥

लागली देहा सरबत्ती ॥चा०॥

न कळे वांझ पती न कळे वांझ वाचले मी अगजाळी ॥३॥

अष्ट विनायक माहोर फिरले तुळजापुर जातिने ॥

कोल्हापुर जोतिबा सिधोबा ओवाळुन वातिने ॥

दिवाळिच्या अवसेस म्हसोबा लिंपुन गुळमातिने ॥चा०॥

राहिले पंढरीस चतुरमास जाउनी ।

गाई तुळस पिंपळाप्रति विनंत्या लाउनी ॥

धुंडिते दवाजाणते लगबग धाउनी ॥चा०॥

साधून साती आसरा ॥ झोटिंग बीर दुसरा ॥

मारुती मुंज्या तिसरा ॥चा०॥

शनवारी आणिला जरी आवतुन धोतरा ॥

निरमाल्य गमे नाही तेज कुण्या मंतरा ॥

हुरहुर करी जीव धीर नुपुरे अंतरा ॥चा०॥

गंगु हैबती कवी गर्जती ॥ संगीन वाद्ये वाजती ॥

महदेव शिष्य साजती ॥ रसिक म्हणे प्रभाकर म्हणे नार फार पडली शोक जाळी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP