कधी येइ प्राणविसावा । मज पासुन दूर नसावा ॥धृ०॥
घरी दारी चित्त जडेना । सुखशय्या मज आवडना ॥
प्रियकर का दृष्टि पडेना ॥चाल॥
असे वाटे घरीच असावा ॥१॥
कारे निष्ठुर सख्या जाहालासी । कोठे जाउन तरी रहालासी ॥
सोडुन या रंगमहालासी ॥चाल॥
कवणाला शोध पुसावा ॥२॥
बरी केलिस सांड दिनाची । नाही पुरली हौस मनाची ॥
काय करू मी रास धनाची ॥चाल॥
किती कसणा प्राण कसावा ॥३॥
झाले फारच दुःख जिवाला । करुणा नये सांब शिवाला ॥
विनवा कवी महादेवाला ॥चाल॥
गुणीराज रसिक प्रभाकर बसावा ॥४॥