मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
प्राणसखे राजसे जिवाला लाव...

लावणी - प्राणसखे राजसे जिवाला लाव...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


प्राणसखे राजसे जिवाला लाविलिस झुरणी ।

करी तळमळ अंतःकरणी ॥ध्रु०॥

बिन पैशावाचून सुंदरी गाठ तुझी पडली ।

दिसंदिस मोहममता जडली ॥

घडाची ती तर गोष्ट बिछानी नाही कधी ग घडली ।

उगीच वरकांती नोक झडली ॥

श्रीमंतास जी असाध्य मजला ती वस्त सापडली ।

रूप आणि गुणाने आवडली ॥चाल॥

हा ऋणानुबंध पूर्व जन्मीचा खरा ।

लागल्या तेव्हा त्या गोष्टी गोड साखरा ॥

काही भिऊन चाल तरी मउ माषुक पाखरा ।

घातल्या मुखामध्ये प्रेमाने वैखरा ॥

वाटतो आता तो ह्रदयांतरी खरखरा ।

तू आहेस अंतर्साक्ष चंद्रशेखर ॥चाल॥

समाचार घेतलास देउन पदार्थ प्रियकरणी ।

होता सय रडतो अंथुरणी ॥१॥

तिसरे प्रहरी फराळास चोरुन पाठवावे ।

कोठे ते सौख्य साठवावे ॥

निजल्या असल्या येउन एकांती बळेच उठवावे ।

बोलणे कितीक आठवावे ॥

हळुच मागिलदारी कुटुंबाकडून गाठवावे ।

ऐक्यपण केवळ वठवावे ॥चाल॥

निष्कपट असा स्नेह दोघांचा असून ।

चालला घरोबा गडे पहिल्यापासून ॥

कधी देवघरामध्ये सोवळ्यात गवसून ।

टाकी अंगावर जळ किंचित हसून ॥काय काय खेळलो पलंगावर बैसून ।

ते स्मरण सखे करु नकोस जाऊ त्रासून ॥चाल॥

शब्दशस्त्र उपसून घाव घालितेस मैतरणी ॥

कसा तो तड लाविल तरणी ॥२॥

वडील जाऊ आहे घरात ती परपुरुषाला भजते ।

रात्री वैरिण जागृत निजत्ये ॥

भांग सरळ सळसळीत करुन न्हाणवली जशी सजत्ये ।

आपण भलत्यांची घरे पुजत्ये ॥

बरे पण आपले पाहून दूर उभि राहून कुजबुजत्ये ।

उभयता धरावया धजत्ये ॥चाल॥

अहो तुम्हासारिखा भ्रतार मजला हवा ।

कसा ब्रह्मदेव प्रारंभी चुकला जवा ॥

मुळी संग न करता जगी जाहला गवगवा ।

आजवर डाक नाही ठाऊक काढिन रवा ॥

दुधखुळा बुळा पति आवडे ना ह्या जिवा ।

म्हणुन मैत्र म्या सुरेख केला नवा ॥चाल॥

काय करू वैभवास देखत मी नार नवी तरणी ॥

सदा सादर तुमच्या स्मरणी ॥३॥

वेणिफणीच्या मिसे सकाळी दर्शनास येत्ये ।

सुखाने आलिंगन देत्ये ॥

कार्य साधुन उघड न व्हावे किति यास्तव भीत्ये ।

बातमी तुमची नित्य नेत्ये ॥

तुम्ही जितके पाजाल पाणी मी पहा तितुके पित्ये ।

झाली चुकी माफ करुन घेत्ये ॥चाल॥

आलीकडेच घरचे वाटु लागले भय ।

परिहार सर्व हरी करिल निःसंशय ॥

विश्वास असू द्या मजकडे लावा लय ।

दृष्टिस पडतजा का मांडली हयगय ॥

समसमान आपले आहे दोघांचे वय ।

सुख देइन तुम्हाला हा तर कृत निश्चय ॥चाल॥

गंगु हैबती महादेवाची सरस कवन करणी प्रभाकर तप्तर प्रभुचरणि ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP