मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
कधी ग भेटसिल आता जिवाचे ...

लावणी - कधी ग भेटसिल आता जिवाचे ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


कधी ग भेटसिल आता जिवाचे जिवलग मैतरणी ।

ऐन उन्हाळ्यामध्ये मुलुखगिरी कठिण प्रियकरणि ॥धृ०॥

हा तरुणपणाचा बहर बघुन जिव रात्रंदिस जळतो ।

आला कपाळी प्रवास आता समय कसा टळतो ॥

अंतर्ध्यानी स्मरण होताना मद ठिकाणचा ढळतो ।

धीर न धरवे तोही अवरता वस्त्रांतरी गळतो ॥

क्षण क्षणा पुरवील हौस असा कोण सखा मिळतो ।

गुण आठवुन सुंदरी तुझे ग जिव आमचा हळहळतो ॥चाल॥

कोण आलिंगन नटुन थटुन देइल वस्त्राभरणी ॥१॥

तुझ्या सारखे रत्‍न आम्हाला असोन अंतरले ।

जन्मांतरिचे पुण्य प्रसंगी आज मागे सरले ॥

चित्र तुझे दे लिहुन सदा जे रसरंगी भरले ।

तरुण स्त्रियेला जरी एकांती कवटाळुन धरिले ॥

तृप्त न होती पंचप्राण हे खचित आता ठरले ॥चाल॥

दृष्टिस जेव्हा पडतिस तेव्हा तुझी तर होती झुरणी ॥२॥

कंठ येतो भरभरून मुलुखगिरी कठिण लष्करची ।

घाम मुखींचा कोण पुशिल मग सय होइल घरची ।

येती उन्हाच्या झळा स्वारि जाचेल घोड्यावरची ॥

कोण खबर कळवील तुला गे नारी प्रहरा प्रहराची ।

मुखात मुख घालुन गोष्टी कोण सांगेल अंतरची ॥

क्षण क्षणा येते रडू कंठ जणू फुटेल सागरची ॥चाल॥

मृगजलापरी ठाई ठाई तुला आम्ही पहात फिरू धरणी ॥३॥

पदोपदी निरवून निघाला तो तिसरे प्रहरी ।

स्फुंदत मागे नेत्र पुशित चालली नागीण लहरी ॥

उभा राहुन मसी बोल सख्या नको खंजीर जहरी ।

शब्द सुखाचा देउन सख्या जा येती मदनलहरी ॥

गंगु हैबती म्हणे जतनकर नवतिची बहरी ।

फते करून खावंद त्वरित येतिल पुण्यशहरी ॥चाल॥

महादेव गुणिराज कवीची जरब पडे कर्णी ।

प्रभाकराचे छंदबाण भेदती अंतःकर्णी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP