मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
चला चांदिण्यामधे जिवलगा न...

लावणी - चला चांदिण्यामधे जिवलगा न...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


चला चांदिण्यामधे जिवलगा नको जाऊ रागे भरून ।

चौरंगावर बसा मी घालिन वारा आदरे करून ॥धृ०॥

मजसारखी रत कांता सदनी तुम्हासारखे पती ।

धन्य विधी निर्मिता ह्या पडल्या गाठी सहजा गती ॥

मर्जिप्रमाणे वर्तत असता आनंदमय चित्तवृत्ती ।

का हो नाही आज तुमची सख्या उदास जाहली मती ॥

बोलविते प्रियकरा केव्हांचिरे तिंदा धरले हाती ।

झिडकारुन टाकिता ह्या सांगा मला कुठुन घेतल्या रिती ॥चाल॥

हा वसंत वरसाभरा रे, जिवलगा ॥

येतो येकदा प्रियकरा रे, जिवलगा ॥

मज संगे करा साजरा रे जिवलगा ॥चाल॥

जरा स्मरुन काही मुरवत पडु द्या बसले आशा धरून ।

नका निराशा करू गुनावर जाते नित मरमरून ॥१॥

फार मसी नये बोल बोलता वरपकारी पैठणी ।

रंग महालमधी उष्मा करितो रात्र असुन चांदणी ॥

तुम्हीच यंदा केलि इमारत बाग नवा नवखणी ।

काही दिवस तरी बहार भोगा रुसणे आहे क्षणो क्षणी ॥

परोपरीचे किति विनवावे वेडी म्हणेल मज कुणी ।

उठा चला राजसा हो फूलली फूलझाडे मालणी ॥चाल॥

मज घेउन मांडिवरी रे, जिवलगा ॥चाल॥

भाषण मधुरोत्तरी परोपरी किती रहावे चुरमुरून ।

नाहि नफा यामधी कि रहाता अयोग्य दुरचे दुरून ॥२॥

सर्व गोष्टी अनुकूल स्वामिला काय न्यूनता असे ।

स्त्रीसाठी होउन फकीर, लोकी नाहि आले गेले तसे ॥

सुज्ञ आपण म्हणविता क्षमाशिळ गृहस्थपणही वसे ।

गुण घेती सर्वत्र हीन प्रारब्ध हे माझे दिसे ॥

सर्व पुढे काहि मिळून राहिल, तारुणपण हे नसे ।

क्षणभंगूर संसार पळपळ सोन्याचे हो जातसे ॥चाल॥

याउपर तुमची खुषी रे, जिवलगा ॥

वागवा मला हर कशी रे, जिवलगा ॥

नाहि उजूर आपल्याविशी रे, जिवलगा ॥चाल॥

ही नवती लुसलुसी कसी होती, कसी जाहली झुरझुरून ।

येवढा वेळ विनविता घाम पाषाणास येता फिरून ॥३॥

सुगंध फुलांचे हार तुरे गजरे माळा गुंफुनी ।

तर्‍हे तर्‍हेची तबके भरली स्वहस्ते म्या शिंपुनी ॥

मन रिझवावे हर कसे तुमचे म्हणुन चापुन चोपुनी ।

पाच नेसले हिरवा, मरवा गेला दवणा करपुनी ॥

करुनी सर्व श्रृंगार घडोघडी मुख पाहुन दर्पणी ।

नकाहो दवडू व्यर्थ शरिर हे बसले पदी अर्पुनी ॥चाल॥

तुम्ही ईश्वर मी पार्वती रे, जिवलगा । देहे घालिन रे कर्वती रे, जिवलगा ॥

जी स्वयंरूप माझी वृत्ति रे, जिवलगा ॥चाल॥

गंगु हैबती म्हणे गडे दे विडे प्रीतिचे करून ।

महादेव करी छंद बूंद गाई रसिक प्रभाकर स्थिरून ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP