मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
परम परदेश कठिण कांते । क...

लावणी - परम परदेश कठिण कांते । क...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


परम परदेश कठिण कांते ।

कसे ग तुज न्यावे सगुण शांते ।

नाही पाहिले उष्ण कधि ग आजवर तु सुकांते ॥धृ०॥

श्रेष्ठ तू मुखरण नारित । तूवर त्या चवर्‍या वारित ।

उभ्या कराव्या सर्व अशि ग तू नाजुक नगरित ।

तुझे रूप सुंदर बहारित ।

गलुंगे गेंद तयारित ।

असे सौख्य जावे त्यजुन हेच प्रारंभी विपरित ॥

नको करु आग्रह आकरित ।

फिरुन येऊ माघारे त्वरित ।

कोण करिल सांभाळ होईल तुझी आबळ रवारीत ॥चाल॥

शीत उष्ण अद्‌भुत प्रभंजन गडे गंगातिरचा ॥

कोमलांग केवळ त्यात तू कलिजा अंतरचा ॥

काय आमचे निजद्रव्य सर्व संसार तूच घरचा ॥चाल॥

म्हणून निरवितो चंद्रवदने । चतुरचातुर्य सुशिलसदने ।

समज मनि कुरवाळू किती मुख शयनी सौख्य दाते ॥१॥

घडोघडी ह्रदयी तुला धरतो ।

शांतवन कवटाळुन करतो ।

क्षण क्षणा गुण सगुण स्नेहाचे चित्तामधे स्मरतो ॥

परस्थळी हा काम आवरतो ।

दुष्ट मानुन मागे सरतो ।

समाधान होइना तुझ्याविण म्हणून भवता फिरतो ॥

होता कधी वियोग मग झुरतो ।

दुःख ते सोसुन सावरतो ।

दुजाभाव दूर करुन सदोदित तव मरण मरतो ॥चाल॥

अंतःकरणा पासुन प्रिया तू आमची आवडती ॥

प्रीतिची प्रियकरिण करूना कदापि नावडती ॥

तुला त्यजुन शिरी प्रवास ध्यावा म्हणुन जिव तडफडती ॥चाल॥

करावे काय प्रसंगाला । आवडले मुळीश्रीरंगाला ।

तशासारिखे भोग भोगणे प्रापत सुरुपवते ॥२॥

विरळ तुजऐसी प्रीतपोष्णा ।

उष्ण ना शीतळ मंदोष्णा ।

विषयकाळी समधात सदा सर्वांग चतुर कृष्णा ॥

भोगिता न पुरे मनतृष्णा ।

सकळ वनितात तू सहिष्णा ।

सर्वगुणसंपन्न पंचरत्‍नात सगुण लष्णा ॥

शब्द शुभदायक अति तृष्णा ।

पुरे ना तुळिता सुधेष्णा ।

चाल चालसी संथ जसी उत्तरपंथी पयोष्णा ॥चाल॥

अमृतवेळा पाहुन ब्रह्मदेवाने मुर्त घडली ॥

फिरत फिरत चार्‍यांशी गाठ बरी मानवात पडली ॥

लावण्याची सहज अम्हाला संदुक सापडली ॥चाल॥

स्वस्थ सावलित रहा घरि तू ।

शोक सागर हा दूर करी तू ।

तुझ्या गळ्याची आण त्वरित येऊ घरी भाग्यवंते ॥३॥

ठेवुन हस्तीवर जरिपटका ।

निघाले रावसाहेब कटका ।

नको घालु आडकाठि साजणी कर आमची सुटका ॥

सोसेना ममतेचा चटका । आदर उपचार आता लटका ।

पाहुन तुझे दीन म्लान वदन मारिता नये झटका ॥

एकांती बसलो साधटका ।

बोल बोलसी तरि तुटका ।

सोड सोड जाउंदे नको धरु कोमल करी पटका ॥चाल॥

कंबरबस्ता करुन निघे निज मंदिरचा ऐना ॥

आता कधी भेटाल फिरुन पहा तरि राजिवनैना ॥

अश्रुपात करी पुशित चालली बोलवित मैना ॥चाल॥

कवन करी गंगु हैबती ।

झडती नावाच्या नौबती ।

महादेव गुणी सुगर प्रभाकर सुमित्र रसवंते ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP