या प्रीतिच्या प्रियपात्रा ।
कोठे जाता हो रात्रिचे कोमलगात्रा ॥ध्रु०॥
म्हणु कैसा आता रे तुला भोळा ।
मला टाकुनी परकीवर ठेविशी डोळा ॥
बाहेरला करसि किरे डोहोळा ।
आधी पुरवावा घरचिचा एकांती सोहोळा ॥
सगुणाच्या सुंदर मोहोळा ।
होती रांडा रे भवताल्या या माशा गोळा ॥चाल॥
सगळ्यांचा तू प्राण प्यारा ।
कुठे लपवावे नित्य उठुन ज्यारा ।
मज विश्रांतिचा पाचक पारा ॥चाल॥
किती विनवावे कंठीच्या मंगलसूत्रा ॥१॥
अशी चुकले मी काय तुझी सेवा ।
दोष निवडुन तो माझ्या तुम्ही मस्तकी ठेवा ॥
सोन्याचा घास घरी जेवा ।
वृथा करिता का सांगा पर अन्नाचा हेवा ॥
नवतीचा नाजुक मेवा ।
कोण्या सवतिला पहावेना हाय हायरे देवा ॥चाल॥
पूर्वीचा वैरभाव होता ।
संधि साधुनी देशि म्हणुन गोता ॥
मज मैनेचा अंतरंग तोता ॥चाल॥
तसा शोभसी या स्वरूपासी राजिवनेत्रा ॥२॥
रात्र अंधारी बंद दिसे रस्ता ।
कोठे जायाचे म्हणुन केला कंबर बस्ता ॥
गस्तीवर फिरती चोरगस्ता ।
मजा मारा गृही पलंगावर का सख्या रूसता ॥
सौख्याचा शब्द नाही नुस्ता ।
मनापासुन दुसरीवर आस्ता ॥चाल॥
एव्हढा जिवप्राण तुला देते ।
चुकी जहाली जर माफ करुन घेते ।
नित्य पलंगवर चार वेळ येते ॥चाल॥
तरी शांतता होइना तुझी कारे चित्रा ॥३॥
खोल अंतरिच्या अरे चित्तचोरा ।
फास घालुन रे ममतेचा नाचविशी दोरा ॥
दैवाचा लेख पाठमोरा ।
मला अंतरला म्हणुनिया तुज ऐसा मोहोरा ॥
करसि घरी नित्य नवा तोरा ।
हाता चढसिल तरी कैसा अरे जंगलच्या मोरा ॥चाल॥
गुरू गंगु हैबतिची करणी । शुद्ध अक्षर ज्यामधी अर्थ भरणी ॥
महादेवाच्या गुणिराज स्मरणी ॥चाल॥
कवी प्रभाकर रायाचा निवडक अंत्रा ॥४॥