बरा मारिलास वार काळजासी ।
प्रीत करुन आता का रे दुरुन जासी ॥ध्रु०॥
गुण सगुण पाहुन मुळीच भाळले रे ।
पतीवाणि सख्या वचन पाळले रे ॥
तुशी नित्य नवे खेळ खेळल्ये रे ॥चाल॥
असे ते तू दिवस आज कसे सांग विसरलासी ॥१॥
खुणा करुन तुला, वरून पालविते ।
हाका मारुन फिरफिरून बोलविते ॥
तारुण्य व्यर्थ तुझ्याविण घालविते ॥चाल॥
स्नेह चालविते भिउन सगुणराशी ॥२॥
ह्याच काळजिने शरीर सुखले रे ।
घरादाराला आज मुकले रे ॥
आज काय तुझ्या वचनी चुकले रे ॥चाल॥
कसा याच समयी वैर साधलासी ॥३॥
नका सोडू धरा प्राणसख्या हाती ।
सुना वेळ जाहाला घड्या निघुन जाती ॥
महादेव गुणीराज छंद गाती ॥चाल॥
करी तोड जोड गोड प्रभाकर चाल खाशी ॥४॥