मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
प्रीत कोण्या कंच्या वाइट ...

लावणी - प्रीत कोण्या कंच्या वाइट ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


प्रीत कोण्या कंच्या वाइट वेळेवर घडली ।

प्राणघेणी कशी मशी अशी मधी विवशी किरे जडली ॥ध्रु०॥

छत्रसिंहासन ज्याच्या घरी त्याची मी दारा ।

चौकी पहार्‍यांचा बंदोबस्त मोठा मनोहरा ॥

कसा येशील कोठे रात्री धरशिल तरी थारा ।

नाही माझ्या माहालामध्ये परपुरुषाचा वारा ॥

त्यात स्वरुपाने तू सुंदर शाईमध्ये तारा ।

केवढी अडचण चहुंकुन पाहा पाहा शोधुन सकुमारा ॥चाल॥

बैस खाली अरे बैस खाली गाठ आज युक्तिने पडली ॥१॥

सौख्य पहिल्यापासून मजला सगळे आठवले ।

आज म्हणुन माहेरी येऊन बोलाऊ पाठवले ॥

दुःख मागील मोठ्या जुलमावर मनी साठविले ।

नित्य मंचकी झुरु झुरु पळि पळी रक्त आटविले ॥

जीव जाता जैसे अवचित अमृत भेटविले ॥

तैसे झाले त्या गोडीने हे शरीर बाटविले ॥चाल॥

सांग गोष्टी मिठी मारून घर कंचुकी तडतडली ॥२॥

फार मजकरता अरे सख्या खराब जाहालास ।

नाड बंदावर आजवर तू व्रतस्थ राहलास ॥

नाही दुसरीचा उर उघडा करून पाहिलास ।

धाक माझा घडोघडी ह्रदयांतरी किती व हलास ॥

ह्याच गोष्टिवर मी खुष उठ चल जाउ माहालास ।

आज सा महिने प्रियपात्रा वियोग साहलास ॥चाल॥

भोग आता रसकस घे बरी ही संधी सापडली ॥३॥

वीस दिवसांचा आहे हुकुम माहेरी राहण्याचा ।

बेत तदनंतर होईल सासरी जाण्याचा ॥

तोवर तू आपला सुखसोहळा पुरीव निजण्याचा ।

कार्य साधुन आब राखावा स्नेहाने शाहाण्याचा ॥

गंगु हैबतिचा आहे लौकिक जगभर गाण्याचा ।

महादेव प्रभाकर नारोबा धरु ठाण्याचा ॥चाल॥

धुंद त्याची फारच सुस्वर मजला आवडली ।

प्रीत कोण्या कंच्या० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP