सख्यासाठी झुरते ग बाई ॥ध्रु०॥
कुठे कुठे पाहू मी प्राणप्रियाला ॥
जाऊन सांगा कुणीग तयाला ।
काय करू मी तरुण देहाला ॥
काळजी अंतरी करते ग बाई ॥१॥
शयन पलंगी करिता मला गे ॥
सख्याविण निद्रा सुखाची न लागे ॥
भेतवा शीतळ गुलाब फुलागे ॥
याच दुःखाने मरते ग बाई ॥२॥
सदोदित सन्निध पति गे असावा ॥
मजपुन रात्रींचा दूर तो नसावा ॥
पहावा प्रीतिने प्राणविसावा ॥
म्हणवून पाय धरते ग बाई ॥३॥
आणा गे आता तो सखयानो घरासी ॥
आलिंगुन लाविन ऊर त्या उरासी ॥
महादेव गाती गुणी गुणराशी ॥
प्रभाकर छंदी पुरते गवाई ॥४॥