मदन-विंचु झोंबला मला त्यात दिवस पाचवा, चला सुखशयनी प्राण वाचवा ॥धृ०॥
बहर ज्वानिचा कहर करी त्यात दिवस पाचवा, चला ॥
प्रीत रीत चालली बरी आजवर अखंडित ।
नव्हती मधी झाली कधी खंडित ॥
बहुत हवाशिर त्यजुन दुरी आरसे महाल मंडित, शयन का केले अशा थंडित हो ॥
सुजाण मुळि म्हणविता तुम्ही सुगर चतुर पंडित, आले समजुन धुंडित धुंडित हो ॥चा०॥
रतुन बहर घ्या लुटुन आधी सकळ रसांच्या चवा ॥१॥
मदन मस्त शरिरात सख्या जणु शिरला की हो करी, बसुन आसनात आकळा करी हो ॥
पाझर सुटले सजीव शिरी आकांत गरमी करी ।
नका मन पाहू उठा लौकरी हो ॥
सहन कराया योग्य जशी सबळ सगुण शांकरी ।
धरा कवटाळुन रजकिंकरी हो ॥चा०॥
संग करुन आज उद्या मला कळेल तशी नाचवा ॥२॥
वेदशास्त्र सांगती शिवे पूर्वी मदन जाळिला ।
तो तर करी कहर आळोआळिला ॥
पहा माझी शाबास कशी कुठवर सांभाळिला ।
समय बोटावर किती चाळिला हो ।
अता न धरवे धीर जिवा हा काळ जरी टाळिला ।
कसे फळ येइल वंश डहाळीला हो ॥चा०॥
हसुन खेळुन पंथ पुढे शेवटास पोचवा ॥३॥
रसरंगाचा काल वृथा निघुन जातो खरा ।
म्हणुन ह्रदयास वाटे खरखरा हो ॥
गंगु हैबती कवन करी राजहंस पाखरा ।
अविट करण्यात वरदि वैखरारे ॥
एक एक अंत्रा रसिक किती खडी पिठी चिनी सखरा ॥
रक्ष महादेव चंद्रशेखरा रे ॥चा०॥
प्रभाकराचे बूट कुणी साक्षेपाने सांचवा ॥४॥