पांच गुण नाटकाचे - १ कथानक - देशकालानुरूप , २ संबिधानक - मजेदार , ३ पात्रानुरूप भाषा , ४ अतिर्हस्व वा अतिदीर्घ असूं नये आणि ५ नानारसात्मक असून बोधप्रद . ( रंगभूमि )
पांच गुण बुद्धीचे - १ निद्रावृत्ति , २ सुनिश्चितता , ३ चित्तनिरोधाचे सामर्थ्य , ४ संशय़ आणि ५ निश्चित स्वरूपाचें ज्ञान . ( अ . भा . शांति अ २५५ )
पांच गुण कावळ्य़ापासून शिकावेत - १ गुप्त रीतीनें संभोग , २ धैर्य , ३ समयाच्या ठायीं संग्रह करणें , ४ साबधानपणा व ५ कोणाचाहि विश्वास न धरणें , ( वृ . चा . ६ - १९ )
पांच गुण ( ब्राह्मण्याचे )- १ सत्य , २ दया , ३ इंद्रियदमन , ४ परोपकार व ५ तपाचरण .
पांच गुण लिपीस आवश्यक - १ निश्चिति ( उच्चारासंबंधीं ), २ उपयोगिता , ३ सरलता , ४ सौंदर्य व ५ लेखनसुलभता .
पांच गुरु ( अभ्युदयेच्छू पुरुषाचे - १ पिता , २ माता , ३ अग्नि ४ आत्मा आणि ५ गुरु . ( म . भा . वन . २१४ . २८ )
पांच गुरु ( स्त्रियांचे )- १ माता , २ पिता , ३ सासू , ४ सासरा व ५ पति .
पांच गोष्टी अकीर्तिकर - १ परान्न , २ दुसर्याचें वस्त्र , ३ परशय्या , परस्त्री आणि ५ परगृहवास .
परान्नं परवस्त्रं च परशय्या परस्त्रियः ।
परवेश्मनि वासश्च शक्रस्यापि श्रियं हरेत् ॥ ( सु . )
पांच गोष्टी अग्निविना जाळणार्या - १ भार्यावियोग , २ स्वजनापवाद , ३ ऋणशेष , ४ कृपणाची सेवा व ५ दारिद्य आल्यावेळीं स्वकीयांचें दर्शन .
पांच गोष्टी अक्षय्यनिधीच होत - १ शील , २ शौर्य , ३ आळसराहित्य , ४ विद्धत्ता व ५ मित्रसंग्रह . यांना चोरीचें भय नाहीं .
शीलं शौर्यमनालस्यं पांडित्यं मित्रसंग्रहम् ।
अचोरहरणीयानि पञ्चैतान्यक्षयो निधिः ॥ ( सु . )
पांच गोष्टी आयुष्यनाशक - १ सायंकाळचें उन्ह , २ प्रेताचा धूर , ३ वृद्धा स्त्रीसंग , ४ सांचलेलें पाणी व ५ नित्य रात्रीं दहीं खाणें .
वृद्धार्कः प्रेतधूमश्च वृद्धा स्त्री थिल्लरोदकम् ।
आयुष्यनाशकं नित्यं रात्रौ दध्यन्नभोजनम् ॥ ( सु . )
पांच गोष्टी आयुष्यवर्धक - १ प्रातःकालचें उन्ह , २ यज्ञधूम , ३ तरूण स्त्री , ४ झर्याचें पाणी व ५ रात्रौ दूध पिणें .
बालार्को यज्ञधूमश्च बाला स्त्री निर्झरोदकम् ।
आयुष्यवर्धकं नित्यं रात्रौ क्षीरान्नभोजनम् ॥ ( सु . )
पांच गोष्टी आदर्श समाजास आवश्यक - १ स्वच्छता , २ टाप - टीप , ३ व्यवस्था , ४ दक्षता आणि ५ सौंदर्यद्दष्टि .
पांच गोष्टी कर्मानें घडतात - १ उत्पत्ति , २ नाश , ३ प्राप्ति , ४ विकार आणि ५ संस्कार ,
पांच गोष्टी ग्रंथनिर्मितीस आवश्यक - १ अवकोकन , २ मनन , ३ अभ्यास , ४ ऊर्मि , आणि ५ अलिप्तता ( संयम ).
पांच गोष्टी चतुरस्त्रतेस आवश्यक - १ देशाटन , २ गुणीविद्व - त्यमागम , ३ वारांग्ना - कलावंताचा सहवास , ४ समेंत मान मिळवणें व तो टिकविणें आणि ५ शास्त्ररहस्य जाणणें . " अनेकशास्त्रार्थविलोकनं च चातुर्यमूलानि पंच " ( सु )
पांच गोष्टी जाणल्याविना मंत्राची सफलता नाहीं - १ ब्राह्मण , २ विनियोग , ३ छंद , ४ ऋषि व ५ देवता .
ब्राह्मणं विनियोगं च छंदं आर्षं च दैवतम् ।
अज्ञात्वा पंच योग मन्त्रे न स तत्फलमश्रुते ॥ ( व्यास )
पांच जीवनमूल्यें - १ युक्ति , २ बुद्धि , ३ भावना , ४ शांति व ५ आत्मसुख . व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनांतील पांच सर्वोत्तम मृल्यें . ( गीताई चिंतनिका )
पांच गोष्टी नसतील तेथें वसति करूं नये - ( अ ) उपजीविकेचें साधन २ अभय , ३ लजा , ४ दाक्षिण्य आणि ५ दानशीलता .
लोकयात्रा भयं लजा दाक्षिण्यं दानशीलता ।
पञ्च यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत् ॥ गरुड ११० - २७ ) ( आ ) १ धनिक , २ श्रोत्रिय ब्राह्मण , ३ शासनाधिकारी , ४ नदी व ५ वैद्य .
धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः ।
पंच यत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत् ॥ ( वृ . चा )
पांच गोष्टी न्यायाधीशास आवश्यक - १ प्रामाणिकपणा २ उद्यम - प्रियता , ३ धैर्य , ४ सभ्यता व ५ कायद्याचें ज्ञान ( न्यायाधीशाचें अंतरंग )
पांच गोष्टी भाषणांत समाविष्ट असाव्यात - १ सौक्ष्म्य - अनेकार्थ संभव , २ सांख्य - गुणदोषरिगणन , ३ क्रम - अनुक्रम , ४ निर्णय - सिद्धांताचा - पुनरुच्चार व ५ प्रयोजन . ( म . भा . शांति अ ३२० )
पांच गोष्टी शोभून दिसतात - १ सशक्तांची क्रीडा , २ प्रियेचा रुसवा , ३ सम्रर्थांची क्षमा , ४ जाणत्याचें बोलणें व ५ अजाणत्याचें मौन . ( सार्थ गाथासप्तशती )
पांच गोष्टी श्रवणास आवश्यक - १ आस्था , २ शरीरस्वास्थ्य , ३ प्रज्ञा , ४ गुरूपदिष्ट प्रकाश व ५ अंतर्निष्ठ धारणा . ( हरिवरदा १ - ७४ . )
पांच गाष्टी परमेश्वरी सत्तेच्या - १ ( खियामत दिन ) शेवटचा न्यायाचा दिवस , २ परमेश्वरच पाऊस पाडतो , ३ गर्भाशयांत काय असतें हें परमेश्वरालाच माहीत असतें , ४ उद्यांची प्राति किती हेम परमेश्वरालाच माहीत असतें आणि ५ कोणाचा अंत कोठें होणार हें त्यालाच माहीत असतें . ( कुराण २१ - ३२ )
पांच गोष्टी पूर्वपुण्याईनें प्राप्त होणार्या - १ यश , २ पुण्य , ३ कलत्र , ४ पुत्र आणि ५ धन .
पांच गोष्टी प्रकट करूं नयेत - १ संपत्तिनाश , २ मनस्ताप , ३ गृहछिद्रें , ४ स्वतःची फसगत आणि ५ अपमान . या पांच गोष्टींची वाच्यता करूं नये .
अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्ररितानि च ।
वञ्चनं चापमानं च मतिमान् न प्रकाशयेत् ॥ ( कौटिल्य )
पांच गोष्टी प्राणी गर्भांत असतांनाच ठरलेल्या असतात - १ आयुष्य , २ कर्म , ३ धन , ४ विद्या आणि ५ मरण . ( वृ . चा . १३ - ४ )
पांच गोष्टीमुळें राष्ट्राची अभिवृद्धि होते - १ न्यायालय , २ संग्राम , ३ धर्मसंरक्षण , ४ योग्य वेळीं योग्य़ विचार करणें आणि ५ सुखी जीवन .
रक्षाधिकरणं युद्धं तथा धर्मानुशासनम् ।
मंत्रचिन्ता सुखं काले पंचभिर्वर्धते मही ॥ ( म . भा . शांति ९३ - २६ )
पांच गोष्टी विद्याप्राप्तीस बाधक - १ अभिमान , २ क्रोध , ३ प्रमाद , ४ रोग आणि ५ आळस ( उत्तराध्ययन सूत्र अ . ११ )
पांच गोष्टी संध्याकाळीं निषिद्ध - १ भोजन , २ मैथुन , ३ निद्रा , ४ वेदपठण आणि ५ मार्गक्रमण ( प्रवास ).
एतानि पञ्च कर्माणि सन्ध्यायां बर्जयेद्बुधः ।
आहारं मैथुनं निद्रा संपाठं गतिमध्वनि ॥ ( नि . र . )
पांच गोष्टी सार्वजनिक उययोगाच्या - १ विहीर , २ तळें , ३ सरोवर , ४ देवालय आणि ५ झाड .
वापीकूपतडागानां देवालयकुजन्मनाम् ।
उत्सर्गात्परतः स्वाम्य मपि कर्तुं न शक्यते ॥ ( ग . प . १०९ - ४६ )
पांच घटक ( राष्ट्राचे )- १ देश , २ वेष , ३ धर्म , ४ संस्कृति आणि ५ भाषा .
पांच तत्त्वें आयुर्वेद चिकित्त्सेचीं - १ गुण , २ रस , ३ वीर्य , ४ विपाक व ५ प्रभाव . ही औषधामधलीं पांच तत्त्वें आयुर्वेद मानतो .
पांच तत्त्वें ( औषधींच्या परीक्षेचीं )- १ गुण , २ रस , ३ वीर्य , ४ विपाक व ५ प्रभाव .
पांच तत्त्वज्ञानें ( भारतकालीन )- १ सांख्य , २ योग , ३ पाशुपत , ४ वेदान्त आणि ५ पांचरात्र , हीं भिन्नभिन्न पांच तत्त्वज्ञानें भारतकालीं प्रचलित होतीं . ( म . भा . शान्ति , अ . ३८९ )
पांच तामिळ महाकाव्यें - १ जीवन चिंतामणि ( तिरुतक्कदेवर ), २ सिलप्पदिकारम् , ३ मणिमेखले , ४ बलयाएदि आणि ५ कुंडलकेसी .
पांच तामिळ लघुकाव्यें - १ यशोधरकाव्य - २ चूडामणि , ३ उदयनकथै , ४ नागकुमारकाव्य आणि ५ नीलकेशी .
पांच देवतरु ( वृक्ष )- १ मंदार , २ पारिजातक , ३ संतान , ४ कल्पवृक्ष आणि ५ हरिचंदन ,
पंचतै देवतरवो मंदाराः पारिजातकः ।
संतानः कल्पवृक्षश्च पुंसि वा हरिचंदनम् ॥ ( अमर )
पांच देवलोकींच्या गायी - १ नंदा , २ भद्रा , ३ सुरभि , ४ सुशीला आणि ५ सुमना .
नन्दा भद्रा च सुरभिस्सुशीला सुमनस्तथा ।
पञ्चगावो विभोर्जाता सद्योजातादि वक्त्रतः ॥ ( सि . शि . )
पांच दोष चित्राचे - १ बोजडरेखा , २ प्रमानमंग , ३ अयोग्य वर्ण - संस्कार , ४ भावनाशून्यत्व व ५ अवयबांचे चुकीचे आलेखन , ( कला - कलातंत्र आस्वाद )
पांच दांभिक लक्षणें - १ लंगोटी घालणें , २ भस्मलेपन , ३ दर्भासन , ४ रुद्राक्षमाला धारण करणें आणि ५ मौन . हीं बाह्म चिन्हें ( त्याप्रमाणें आचरण नसेल तर ) म्हणजे दांभिक लक्षणें होत .
पांच देहांतर्गत दोष - १ काम , ५ क्रोध , ३ भय ४ निद्रा आणि ५ श्वास . हे पांच दोष शरिरांत स्वभावसिद्धि असतात .
कामक्रोधौ भयं निद्रा पञ्चमः श्वास उच्यते ।
एते दोषाः शरीरेशु द्दश्यन्ते सर्वदेहिनाम् ॥ ( म . भा . शांति २९० - ५४ )
पांचदेव प्राणिमात्राला आरोग्य देणारे - १ पर्जन्य २ ( प्राण ) वायु , ३ जलदेव - वरुण , ४ चंद्र व ५ सूर्य . ( अथर्ववेद )