तीन प्रकारचीं स्नानें - १ नित्य , १ नैमित्तिक व ३ काम्य . ( आचारमयूख )
तीन प्रकार हिरडयांचे - १ बाळहिरडा , २ सुरवारी हिरडा आणि ३ चांभार हिरडा .
तीन प्रतीति ( अनुभव )- १ गुरुप्रतीति , २ शास्त्रप्रतीति व ३ आत्मप्रतीति ( दा . बो . ५ - ९ )
तीन प्रतिज्ञा महत्त्वाच्या ( स्त्रीजीवनांत )- १ आज्ञापालन २ चारित्र्य आणि ३ दारिद्य . ( सेंटटेरेसी - स्पॅनिश स्त्री ) ( जीवन विकास , मासिक )
तीन प्रधान विषय महाकाव्याचे - १ प्रेम , २ धर्म व ३ संग्राम .
तीन प्रपंच - २ स्थूल प्रपंच ( कुटुंबपोषण ), २ सूक्ष्म प्रपंच ( कुटुंब पोषणाविषयींचें मनोराज्य ) आणि ३ कारण प्रपंच ( परोपकारबुद्धि ).
तीन प्रमाणें - ( अ ) १ प्रत्यक्ष , २ अनुमान आणि ३ शास्त्र ( मनु . १२ - १०५ ); ( आ ) १ श्रुति , २ धर्मशास्त्र आणि ३ लोकसंग्रह .
" धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं प्रथामं श्रुतिः ।
द्वितीयं धर्मशास्त्रं तु तृतीयं लोकसंग्रहः ॥ " ( सु . )
तीन प्रमेयें ( सांख्य दर्शन )- १ अव्यक्त , २ व्यक्त आणि ३ ज्ञ म्हणजे जाणणारा पुरुष . ( सांख्यकारिका )
तीन प्रमेयसिद्धान्त ( अद्वैत - वेदांत )- १ ब्रह्म हेंच सत्य आहे , २ जगत् हें मिथ्या आहे व ३ जीव हा वस्तुतः परमात्माच आहे .
श्लोकाधेंन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ।
ब्रह्म सत्यं , जगन्मिथ्या , जीबो ब्रह्मैव नापरः ॥ ( श्रीशंकराचार्य )
तीन प्रमुख गुणा ( धनुर्विद्येचे )- १ अति लहान वस्तूचा वेध करणें , २ अति दूरग्राही वेध करणें आणि ३ अति कठीण पदार्थ फोडणें . धनुर्धर अर्जुन हा असा तिन्ही गुणांत प्रवीण होता .
लक्ष्मणो लघुसन्धानः दूरपाती च राघवः ।
कणों द्दढप्रहारी च पार्थस्यैते त्रयो गुणाः ॥ ( सु . )
तीन प्रयोजनें परमेश्वरी अवताराचीं - सज्जनांचें पालन . २ दुर्जनांचा नाश आणि ३ धर्म - संस्थापना . ( भ . गी . ४ - ८ )
तीन प्राचीन संस्कृत व्याकरण - ग्रंथकार - १ पाणिनी - सूत्रकार , २ कात्यायन - वार्तिककार , आणि ३ पतंजलि - भाष्यकार .
तीन प्राचीन भारतीय ज्योतिर्वेत्ते - १ आर्यभट्ट , २ वराहमिहिर आणि ३ भास्कराचार्य .
तीन प्राचीन महायुद्धें - १ देव - दानव युद्ध , २ राम - रावण युद्ध आणि ३ कौरव - पांडव युद्ध . यांतील प्रमुख नायकांस युद्धावर पाठविण्यापूर्वी ब्रह्मोपदेश करण्यांत आला . ब्रह्मदेवानें इंद्रास , वसिष्ठानें रामास व श्रीकृष्णानें अर्जुनास गीता सांगितली .
तीन फलें योगासनामुळें प्राप्त होणारीं - १ नाडीशुद्धि , २ शरीरास आरोग्य व ३ अंगांत चपलता ( योगसोपान - पूर्व चतुष्टय )
तीन फलज्योतिषशास्त्राचे आद्यप्रणेते - १ पराशर , २ जैमिनी व ३ वराहमिहिर .
तीन बलें - १ मंत्र ( युक्ति ), २ कोश आणि ३ सैन्य हीं राजसत्तेचीं तीन बलें .
तीन बंध - १ मूलबंध , २ उड्डियान बंध आणि ३ जालंधर बंध . हीं तीन योगशास्त्रांत श्रेष्ठ मानिलीं आहेत . ( गोरक्षपद्धति )
तीन बंधनें पृथ्वीवरील - १ अन्न , २ स्थान आणि ३ बीज . ( ऋग्वेद मंडल १ - १६३ )
तीन ब्रीदवाक्यें फ्रेंच राज्यकांतीचीं - १ स्वातंत्र्य , २ समता आणि ३ बंधुभाव .
तीन भरत - १ रामसखा भरत , २ दुष्यंतपुत्र भरत आणि ३ जीवन्मुक्त जडभरत . हे तीन प्राचीन काळीं आदर्शभूत होऊन गेले .
तीन भाग आयुर्वेदाचे - १ हेतु स्कंध , २ लक्षण स्कंध व ३ औषध स्कंध या तीन भागांस आयुर्वेदाची त्रिसूत्री म्हणतात .
तीन भाग धर्माचे - १ यज्ञ - उपासना २ अध्ययन - ज्ञानार्जन व ३ दान - परोपकार ( छांदोग्य २ - १३ - १ )
तीन मद - १ धनमद , २ विद्यामद आणि ३ उच्च कुलाचा मद . विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मदः । ( म . भा . उ . ३४ - ४४ )
तीन महत्त्वाचे प्रसंग ( माणसाच्या आयुष्यांत )- १ जन्म , २ विवाह आणि ३ मृत्यु .
तीन महा आनंद - १ स्वतःचा विवाह , २ सत्पुत्रलाभ आणि ३ पुत्राला पुत्रप्राप्ति होणें . हे संसारांतले तीन महा आनंद होत .
जैं होतसे अपुलें स्वयंवर । आणिक सत्पुत्र होय संसारीं ।
आणिक पुत्रासी पुत्र होय तरी । विशेष चतुर्गुण ॥ ( काशीखंड ७६ - १६० )
तीन महान् शक्ति जीवन घडविणार्या - १ आत्मज्ञानशक्ति , २ विज्ञानशक्ति आणि ३ साहित्यशक्ति ( विनोबाजी )
तीन साधनें भक्तीचीं - १ श्रवण , २ कीर्तन आणि ३ भजन ( शिव . विश्वेश्वर ३ - २२ )
तीन माता - १ र्ह्स्व २ दीर्घ व ३ ष्लुत .
तीन मानसिक पापें - १ परधनापहार करण्याचा विचार करणें , २ मनानें दुसर्याचें अहित चिंतिणें आणि ३ खोटा दुराग्रह .
परद्रव्येष्बभिघ्यानं मनसानिष्टचिंतनम् ।
वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतम् ॥ ( स्कंद - काशी खंड २७ - १५४ )
तीन मार्ग मोक्षप्राप्तीचे - १ कर्मयोग , २ ज्ञानयोग आणि ३ भक्तियोग .
" मार्गास्त्रयो एम विख्याता मोक्षप्राप्तौ नगाधिप ॥ " ( देवी भा . ७ - ३७ - २ )
तीन मूर्ख - ( अ ) १ विरक्त पण लोभी , २ योगी पण इंद्रियासक्त आणि ३ व्युअत्पन्न पण क्रोधी ; ( आ ) १ ज्ञानी पण वैराग्यरहित , २ श्रद्धाहीन भक्त व २ कुटुंबसंग्रही पण निर्धन .
तीन युगांतले तीन दाते - सत्ययुग - बलि , २ त्रेतायुअग - श्रीरामचंद्र व ३ द्वापरयुग - कर्ण आणि कलियुग ( ? )
तीन योग - ( अ ) कर्मयोग , २ भक्तियोग आणि ३ ज्ञानयोग ; ( आ ) १ कालयोग , २ दैवयोग आणि ३ प्रारब्धयोग .
तीन रथ आकाशगामी - १ अश्विनीकुमारांचा रासभ रथ , २ उषेचा वृषभ रथ व ३ सूर्याचा सप्ताश्व रथ . असे प्राचीनांनीं मानिलें आहे . ( अशोक ते कालिदास )
तीन रत्नें ( इहलोकींचीं )- १ अन्न , २ उदक आणि ३ सुभाषित . पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् । ( वृ . चा . १४ - १ )
तीन रूपें ( अग्नीचीं )- १ आहवनीय - देवांचा , २ गार्हपत्य - मानवांचा व ३ दक्षिणाग्नि - पितरांचा .
तीन रूपें पदार्थांचीं - १ स्थाणुरूप , २ द्रवरूप व ३ वायुरूप अशा तीन रूपांत पदार्थ जगांत आढळतात .
तीन रूपें ( भगवंताचीं )- १ प्रकृति , २ पुरुष आणि ३ काल . अशीं सृष्टयुअत्पत्तिसमयीं भगवंताचीं तीन रूपें प्रकट होतात . ( कल्याण नारद - विष्णुपुराणांक )
तीन रूपें ( श्रीविष्णूचीं )- १ महत् - ब्रह्मांडाला उत्पन्न करणारें , २ ब्रह्मांडांत असलेलें आणि ३ सर्वभूतस्थ . तृतीयं सर्वभुतस्थं - तानि ज्ञात्वा विमुच्यते ( भारतीय दर्शनसंग्रह )
तीन रूपें ( सूर्य देवतेचीं )- १ उदयकालीं - ब्रह्मरूप , २ माध्यान्हकालीं - रुद्ररूप व अस्तमानकालीं - विष्णुरूप . " अस्तमाने स्वयं विष्णुस्त्रिमूर्तिश्व दिवाकरः " ( आदित्य हृदय )
तीन लयी ( संगीत शास्त्र )- १ द्रुत , २ मध्यम आणि ३ विलंबित .
तीन लक्षणें ( नित्यसंन्याशाचीं )- १ इच्छा न धरणें , २ द्वेष न करणें आणि ३ द्वन्द्रभाव धारण न करणें ( भ . गी . ५ - ३ ).
तीन लक्षणें विभूतिमत्त्व ओळखण्याचीं - १ ऐश्वर्य , २ शोभा आणि ३ प्रभाव .
तीन लक्षणदोष ( काव्य शास्त्र )- १ अव्याप्ति , २ अतिव्याप्ति आणि ३ असंभव ( काव्य प्रकाश ).
तीन लक्षणें ( साधूचीं )- १ सन्मानाचा हर्ष नाहीं , २ अपमानाचा राग नाहीं व ३ क्रोध आला तरी कठोर वाणि नाहीं . हीं साधूचीं तीन लक्षणें होत .
न प्रह्रष्यति सन्मानैर्नावमानैः प्रकुप्यति ।
न क्रुद्धः पुरुषं ब्रूयादेतत्साधोस्तु लक्षणम् ॥ ( गरुड ११३ - ४२ )
तीन लाभ ( आसनापासून ) व्यवहारद्दष्टया - १ नाडीची शुद्धि , २ आरोग्य आणि ३ अंगचापल्य .
आसनस्य फलान्वक्ष्ये प्रथमं नाडिशोधनम् ।
द्वितीयं शरीरारोग्यं तृतीयं चांगलाघवम् ॥ ( सु . )
तीन लोक अथवा त्रिभुवनें - ( अ ) १ स्वर्ग , २ मृत्यु व ३ पाताळ ; ( आ ) १ भूमि , २ अंतरिक्ष आणि ३ द्यौ ; ( इ ) १ मनुष्यलोक , २ पितृलोक व ३ देवलोक ( शतपथ ) " त्रींल्लोकान्न्याप्य भूतात्मा " ( म . भा . अनु - अ १४९ )
तीन लोक - १ वाणी - पृथ्वी , २ मन - अंतरिक्ष व ३ प्राण - स्वर्गलोक . ’ वागेवायं लोकः मनो अंतरिक्षलोकः प्राणोऽसौ लोकः ’ ( बृ . १।५।४ )
तीन वर्ग पदार्थांचे - १ खनिज , २ उद्धिज्ज व ३ प्राणिज . जगांतील यच्चयावत् पदार्थ या तीन वर्गांपैकीं कोणत्यातरी वर्गांत समाविष्ट असतात .
तीन वस्तु दातृत्वांत प्रसिद्ध - १ कामधेनु , २ चिंतामणिरत्न व ३ कल्पवृक्ष .
तीन वस्तु ( दुसर्याच्या स्वाधीन करूं नयेत )- १ ग्रंथ , २ स्त्री व ३ पैसा .
" पुस्तकं वनिता वित्तं परहस्तगतं गतम् ।
यदि चेत्पुनरायाति नष्टं भ्रष्टं च खंडितम् ॥ " ( सु . )
तीन वाद ( वेदातशास्त्र )- १ आरंभवाद - जसे मृत्तिकेपासून घटाची उत्पत्ति . हा आरंभवाद - नैयायिकांचा आहे . २ परिणामवाद - दुधापासून दही होणें ( सांख्य ) आणि ३ विवर्तवाद - दोरीवर सर्पाचा आभास होणें ( अद्वैत वेदान्त ).