एक - एकोऽहम् - एकच ब्रह्म हें एकच आहे . एकच ’ सत् स्वरूप ’ ’ एकोऽहम् बहु स्याम् ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे . ( अंकशास्त्र )
एक अग्नि , एक सुर्य आणि एकच उषा - एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो , एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व प्रकाशित करते . एकापासूनच हा सर्व पसारा झाला आहे . ( ऋग्वेद ८ - ५८ - २ )
एक आत्मा - जगदात्मा .
एककरपद्धति -( अर्थशास्त्र ) - सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावरच कर बसविण्याचें तत्त्व म्हणजे सर्व करांचें एकीकरण . ( म . श . को . )
एक खांबी - ज्या कुटुंबांत फक्त एकच कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात . एकटाच कर्ता पुरुष असलेलें घर .
एक चक्त - सूर्याचा रथ ( प्रामाणिक हिंदी कोश )
एकतत्त्ववाद - या जगांत फक्त एकच सत्य तत्त्व आहे , मग तें भौतिक असो अथवा आध्यात्मिक असो . या तत्त्वज्ञानविषयक मतास एकतत्त्ववाद म्हणतात . ( म . ज्ञा . को . विभाग ९ )
एक तिथि - अखंड तिथि म्हणजे सूयोंदयापासून कर्मकालपर्याप्त असलेली म्हणजे पूर्ण .
एकदंत - गणपति . एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् । ( गणपति अथर्वशीर्षम् ). ’ नमन तुज एक्दंता । एकपणें तूंचि आतां ’ ( ए . भा . १ - २ )
एकनाड - पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या जन्मनक्षत्रावरून आद्य , मध्य व अन्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात . जन्मनक्षत्रानुसार येणारी नाडी एकच असेल तर अशा स्त्री - पुरुषांचा विवाह होत नाही . त्यास ’ एकनाड ’ आली असें म्हणतात .
एक परमेश्वर - परब्रह्म वा परमेश्वर ( ईश्वर एकच आहे ).
एकवाणी , एकवचनी आणि एकपत्नी - मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र .
तद् ब्रूहि वचनं देवि राज्ञो यदभिकांक्षितम् ।
करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते ॥
( वा . रा . अयोध्या १९ - ३० )
द्वि : शरं नाभिसंधत्ते रामो द्विर्नाभिभाषते । ( सु . )
एक मूळप्रकृति - आदिमाया .
एकाक्ष - एका डोळ्यानें आंधळा , शुक्ताचार्य .
एकाक्षरी मंत्र - " ॐ ". हें ईश्वराचें उत्तमोत्तम प्रतीक . यासच एकाक्षर ब्रह्म . शब्द ब्रह्म किंवा ॐ कार म्हणतात . ओमिति ब्रह्म । ओमितींद सर्वम् ( तैत्तिरीय शिक्षावल्ली ) ॐ इत्येतदक्षरमिदम् ( मांडुक्य ) ( आ ) द द द म्हणजे दमन , दान आणि दया . प्रजापतीनें अनुक्रमें देव , मनुष्य व असुर या आपल्या तिन्ही अपत्यांस हा एकाक्षरी मंत्र दिला . ( बृहदारण्यक अ . ५ - २ )
एक देव - देव एकच आहे . एको देव : सर्वभूतेषु गूढ : । सर्व व्यापी सर्वभूतान्तरात्मा ( श्वेताश्वेतर ६ - ११ )
एकेरी मार्ग - मृत्यूचा रस्ता . या रस्त्यानें जातां येतें ; पण परत येता येत नाही .
एक वेद , एक देव व एकच वर्ण - पूर्वी एकच वेद , सर्व वाड्मया - त्मक प्रणव ( ओंकार ) एकच , नारायण हा एकच देव , एकच अग्नि , एकच वर्ण व एकच भाषा होती . ’ एकवर्णा : समा भाषा एकरूपाश्व सर्वश : । ’ ( वा . रा . उत्तरकांड ३० - १९ )
एक एव पुरा वेद : प्रणव : सर्ववाड्मय : ।
देवो नारायणो नान्य एकोऽग्रिर्वर्ण एव च ॥
( भागवत स्कंध ९ अ . १४ - ४८ )
एकाच वृक्षा ( देह ) वरील दोन पक्षी - १ जीवात्मा आणि २ परमात्मा . ’ द्वा सुपर्णा सयुजा सखाया ’ . ( मुंडकोपनिषत् )
एक शत्रु - अज्ञान हा मनुष्य जातीचा एक महान् शत्रु आहे . ’ एक : शत्रुर्न द्वितीयोऽस्ति शत्रुरज्ञानतुल्य : पुरुषस्य राजन् । ’ ( म . भा . शांति २९ - २८ )
एकात्मवाद - आत्मा एक आहे व तो सर्वत्र व्याप्त आहे . हा वेदान्त - शास्त्राचा एक मुख्य सिद्धान्त . मूळ सांख्यशास्त्रकारांना एकात्मवाद मान्य नाहीं . ते आत्मे ( पुरुष ) अनेक मानतात . " जन्मादि व्यवस्थात : पुरुष बहुत्वम् " ( सांख्यसूत्र ६ - ४५ )
एकाचें आश्रयानें असणारे एकवीस गुण - १ रूप , २ रस , ३ गंध , ४ स्पर्शे , ५ . एकत्वम् , ६ पृथक्वम् , ७ परिमाण , ८ परत्व , ९ अपरत्व , १० बुद्धि , ११ सुख , १२ दु : ख , १३ इच्छा , १४ द्वेष , १५ यत्न , २६ गुरुत्व , १७ द्ववत्व , १८ स्नेह , १९ संस्कार , २० अद्दष्ट व २१ शब्द . ( शब्द कल्पद्रुम )
एकाध्यायी गीता - गीतेचा अठरावा अध्याय . ’ अठरावो अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वांसरूचि गाय दुहे । तैं बेळु कायसा ?’ । ( ज्ञा . १८ - ८४ )