पंचभयें - १ ईश्वरभय , २ धर्मभय , ३ समाजभय , ४ शासनभय व ५ शरीरभय . हीं पांच भयें मानवाला दुराचरणापासून परावृत्त करणारीं . ( तुलसीदल )
पंच भक्तिमती - १ अनसूया , २ शबरी , ३ गोपीजन , ४ विदुर - पत्नी व ५ राणी मीरा . या पांच प्रसिद्ध भक्तिमती होत .
पंचभद्र - १ गुळवेल , २ पित्तपापडा , ३ वाळा . ४ काडे चिराईत व ५ सुंठ . या पांच वनस्पतींस आर्यवैद्यकांत पंचभद्र म्हणतात . ( आ ) १ सर्व शरीर पिवळें असून पाय आणि तोंड मात्र श्वेतवर्ण असणारा घोडा . किंवा १ कंठ , २ पाठ , ३ मुख , ४ कटि व ५ पार्श्वभाग या पांच ठिकाणीं भोवरें असलेल्या घोडयास म्हणतात . हा शुभ लक्षणी मानतात . ( म . वा . को . )
पंचभ्रम - १ भेदभ्रद , २ कर्तूत्वभ्रम , ३ संगभ्रम , ४ विकारभ्रम आणि ५ सत्याभास . ( मो . प्र . )
पंचभाव - ( अ ) १ शांत , २ दास्य , ३ सख्य , ४ वात्सल्य आणि ५ मधुर . या पंचभावास आध्यात्मिक जगतांत पंचभाव म्हणतात .
( आ )
१ सृष्टि , २ स्थिति , ३ प्रलय , ४ तिरोभाव व ५ अनुग्रह ( संस्कृतीचीं प्रतीकें . )
पंच भावना - ( अ ) १ आदर , २ भीति , ३ आश्चर्य , ४ आनंदा व ५ प्रेम ( आ ) १ भय , २ विरोध , ३ आप्तपणा , ४ स्नेह व ५ भक्ति . या पांच उत्कट भावनांपैकीं परमेश्वरासंबंधानें राज वेनाची एकहि भावन नव्हती , अशी भागवतांत कथा आहे . ( भाग ७ - १ - ३७ )
पंचभिक्षु - १ कौडिण्य , २ वप्र , ३ भद्र्यु , ४ महानाम व ५ अश्वजित् . हें गौतमबुद्धानें प्रथत उपदेशिलेले पांच भिक्षु होत .
पंच भिक्षुव्रतें - १ चोरी न करणें , २ ब्रह्मचर्य , ३ त्याग , ४ लोभाचा अभाव व ५ अहिंसा .
अस्तेयं ब्रह्मचर्यं च त्यागो लोभस्तथैव च ।
व्रतानि पञ्च मिक्षूणामहिंसा परमाणि वै ॥ ( मार्कण्डेय पु . )
पंचभू - संस्कार - १ परिसमूहन - पाणी शिंपडणें , २ उपलेपन - गोमयानें सारवणें , ३ उल्लेखन - देवता नामांचा रेखानें उल्लेख करणें , ४ मृद्उद्धरणमाती उकरून काढणें आणि ५ अभ्युक्षण - प्रोक्षण करणें , होमहवन प्रसंगीं अग्नि प्रतिष्टापना करण्यापूर्वी अशा पांच प्रकारांनीं भृ - शुद्धि करावयाची असते . ( गृह्मसूत्रें )
पंच भेद ( संन्याअ दीक्षेचे )- १ आश्रच , २ तीर्थ , ३ सरस्वती , ४ भारती व ५ परमहंस . असे पांच प्रकार .
पंचभृंग - १ देवदालीं ( देवडंगरी ), २ शमी , ३ भृंग ( भांग ), ४ निर्गुंडी आणि ५ तामलक . ( म . वा . को . )
पंच ’ म ’ कार - १ मद्य , २ मांस , ३ मत्स्य , ४ मुद्रा आणि ५ मैथुन . या पांच वस्तूंचें सेवन हा शाक्तपंथांतील वाममागींयांत आचारधर्म समजला जातो .
मकारपञ्चकं देवि । देवानामपि दुर्लभम् ॥ ( गुप्तसाधनतंत्र )
पंच महाकव्यें ( संस्कृत )- १ रघुवंश , २ कुमारसंभव , ३ किराता - र्जुनीय , ४ शिशुपालवध व ५ नैषधचरित .
पंच महाग्रह - १ मंगळ , २ बुध , ३ गुरु , ४ शुक्र आणि ५ शनि .
पंच मानव ( पांच प्रकारचे लोक )- १ विद्वान , २ शूरवीर , ३ व्यापारी , ४ कारगीर व ५ वन्यजन . ( अथर्व - अनु - मराठी )
पंच महातत्त्वांचीं देवस्थानें - १ पृथ्वी - कांचीवरम् , २ आपजंबुकेश्वरम् , ३ तेज - अरुणाचलम् , ४ वायु - कालहस्ति व ५ आकाश - चिदंबरम् . हीं पांचीं देवस्थानें दक्षिण भारतांत मद्रास राज्यांत आहेत .
पंच महातत्त्वांचीं पांच विषय - १ पृथ्वी - गंध , २ आप - रस , ३ तेज - रूप , ४ वायु - स्पर्श आणि ५ आकाश - शब्द , ( तत्त्व - निजबोध - विवेक )
पंच महातत्त्वांचीं दहा इंद्रियें - १ पृथ्वी - नाक व गुद , २ जल - जीभ व लिंग , ३ तेज - नेत्र व पाय , ४ वायु - त्वचा व हात आणि ५ आकाश - कान व मुख . ( तत्त्व - निजबोध - विवेक )
पंच महादीक्षा - १ स्पर्श - दीक्षा , २ द्दष्ट - दीक्षा , ३ ध्यान - दीक्षा , ४ शब्द ( मंत्र )- दीक्षा आणि ५ संकल्प - दीक्षा . ( माऊली विशेषांक )
पंच महापातकें - ( अ ) १ ब्रह्महत्त्या , २ भरूणहत्त्या , ३ बालहत्या , ४ गोहत्त्य आणि ५ स्त्रीलत्त्या ; ( आ ) १ ब्रह्महत्त्या , २ सुरापान , ३ चोरी , ४ गुरुदारागमन आणि ५ अशांशीं संसर्ग ठेवणें . हीं पंचमहापातकें व हीं ज्यांचेकडून घडतात ते पंचमहापातकी होत . ( स्कंदकुमा . ३६ - २ )
पंच महाभूतें - १ पृथ्वी , २ आप , ३ तेज , ४ बायु आणि ५ आकाश , हीं पंच महाभूतें परमात्म्यानें विश्वोत्पत्तीकरितां निर्माण केलीं .
( क . गी . २ - १३ ) यांना भूतपंचक म्हणतात .
पंचमहाभूतांचे स्वभाव , धर्म , गुण , आकार आणि रंग -
१ पृथ्वी - कठोरता - गंध - भ्रमण - स्थूल - पीत
२ आप - शीतलत्व - रस - अधोगमन क्रिया - स्थूल - श्वेत .
३ तेज - उष्ण अथवा प्रकाश - रूप - ऊर्ध्वगमन क्रिया - स्थूल - लाल - सूक्ष्माकार .
४ वायु - कोमलत्व - स्पर्श अथवा शब्द - तिर्यग्गमन क्रिया - सूक्ष्माकार - हिरवा .
५ आकाश - शून्यधर्म - निर्गुण - अक्रिय - गोलाकार - रंगरहित . ( पंचग्रंथी )
पंच महाभूतांचीं पांच प्रतीकें - १ पृथ्वी - आयत , २ आप - वर्तुळ , ३ तेज - त्रिकोन , ४ वायु - चंद्रकोर व ५ आकाश - ज्योत . ( केसरी २१ ऑगस्ट १९६० )
पंच मात्रा - १ अकार , २ उकार , ३ मकार , ४ इकार आणि ५ बिंदु , या पंच मात्रा होत .
पंच महायज्ञ - १ ब्रह्मयज्ञ - अध्यापन , २ पितृयज्ञ - तर्पण , ३ देवयज्ञ - वैश्वदेव होम , ४ भूतयज्ञ - बलिहरण व ५ मनुष्ययज्ञ - अतिथि - सक्तार .
अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञश्च तर्पणम् ।
होमो दैवो बलिर्भूंतो नृयज्ञोऽतिथिपूजनम् ॥ ( मनु . ) ( आ ) १ मातृपितृभक्ति , २ पातिव्रत्य , ३ समता , ४ मित्रांचा द्वेष न करणें व ५ विष्णुभक्ति .
पित्रोरर्चाऽथ पत्युश्च साम्यं सर्वजनेषु च ।
मित्राद्रोहो विष्णुभक्तिरेते पञ्चमहामखाः ॥ ( पद्म . सृष्टि , ७ - १३ )
पंच महाविषें - १ सोमल , २ हरताळ , ३ मनशीळ . ४ वत्सनाभ आणि ५ सर्प विष . ( शा . नि . )
पंच महाव्रतें ( जैनधर्म )- १ अहिंसा , २ असत्य त्याग , ३ अस्तेय ४ ब्रह्मचर्य व ५ अपरिग्रह . अशीं पांच व्रतें पाळण्याची भिक्षु - मिक्षुणींस शपथ घ्यावी लगते ; ( आ ) १ सत्य , २ अस्तेय , ३ अहिंसा , ४ ब्रह्मचर्य व ५ शास्त्र आज्ञापलन . हीं सर्वसामान्य पंचमहाव्रतें .
पंच महाव्याधि - १ मूळव्याध , २ यक्ष्मा ( क्षय ), ३ कोड , ४ प्रमेह आणि ५ उन्माद .
पंच महाभूतांचीं पंचवीस तत्त्वें - ( १ ) पृथ्वी - १ अस्थि , २ मांस , ३ नाडी , ४ त्वचा व ५ रोम ; ( २ ) अपा - १ शुक्त ( वीर्य ), २ शोणित
( रक्त ), ३ लाळ , ४ मूत्र व ५ स्वेद ; ( ३ ) तेज - १ क्षुधा , २ तुषा , ३ आलस्य , ४ निद्रा व ५ कांति ; ( ४ ) वायु - १ चलन , २ वलन , ३ पलायन , ४ प्रसरण व ५ आकुंचन ; ( ५ ) आकाश - १ काम , २ क्रोध , ३ शोक , ४ मोह व भय . ( विचारचंद्रोदय दर्शन )
पंच महाशब्द - ( अ ) १ झांज , २ नगारा , ३ कर्णा , ४ चौघडा व ५ पिपाणी ; ( आ ) १ शिंग , २ ताशा , ३ नगारा , ४ शंख व ५ जय - घंटा , हीं पांच मोठया आवाजाचीं वाद्यें होत व तीं प्राचीन काळीं राजाची स्वारी निघाली असतां वाजवीत असत . तो एक प्रकारचा मान
( विरुद ) समजला जात असे .
पंच महासरोवरें - १ बिंदु सरोवर - सिद्धपूर - मातृगया , २ नारायण सरोवर - कच्छप्रांत , ३ मानस सरोव - हिमालयांत , ४ पुष्कर - अजमीरजवळ व ५ पंपा सरोबर - होसपेठजवळ .
पंच महासागर - १ उत्तर महासागर , २ दक्षिण महासागर , ३ हिंदी महासागर , ४ पॅसिफिक ( प्रशांत ) महासागर आणि ५ अटलांटिक महासागर , हे पृथ्वीवरील पंच महासागर होत . यांत प्रशांत महासागर अधिक खोल व मोठा आहे .
पंच माता - १ राजपत्नी , २ गुरुपत्नी , ३ मित्रपत्नी अथवा भ्रातृपत्नी , ४ पत्नीमाता ( सासू ) आणि ५ आपली माता . या पांच माता - मातेसमान होत . ( वृ . चा . ४ - २० )
पंच प्यारे - शिखांचे दहवे गुरु . गुरु गोविंदसिंग यांनीं खालसा पंथ स्थापन केला . त्यांनीं ज्या पहिल्या पांच जणांना पंथाची दीक्षा दिली त्यांस पंचप्यारे म्हणतात . तेः - १ दयाराम , २ धरमचंद , ३ मुखनचंद , ४ साहेबचंद व ५ हिंमतराय . ( शिखांचा इतिहास )
पंचमुखें ( शिवदेवतेचीं )- १ सद्योजात , २ वामदेव , ३ अघोर , ४ तत्पुरुष आणि ५ ईशान . अशीं शिवाचीं पांच मुखें व स्वरूपें होत .
( पाशुपततंत्र ) यांनाच पंचब्रह्में असेंहि म्हणतात त्यांपासून अनुक्रमें १ रेणुकाचार्य , २ दारुक ( मरुल ), ३ घंटाकर्ण ( एकोराम , ४ धेनुकर्ण
( पंडिताराध्य ) व ५ विश्वकर्ण ( विश्वाराध्य ) असे पंचाचार्य अवतरले . ( सुप्रवोधागम )
पंच मुद्रा - ( अ ) ( जप विधि ) १ कमल , २ कलश , ३ धेनु , ४ ज्ञान आणि ५ अंजलि . अशा पांच प्रकारच्या मुद्रा करून जप करावा असें सांगितलें आहे .
कमलं कलाशं धेनुं ज्ञानमञ्जलिमेव च ।
पञ्चमुद्राः प्रदशीं श्रीसूक्तं च जपेद्बुधः ॥ ( श्रीसूक्त फलश्रुति ) ( आ ) ( मुद्रा धारण ) १ चक्र , २ शंख , ३ गदा , ४ पद्म आणि ५ नारायण . अशा पांच मुद्रा मध्वसंप्रदायी शरीरावर धारण करतात . ( इ ) ( दीक्षाविधि ) १ भिक्षापात्र , २ दंडकाष्ठ , ३ भगवी कंथा , ४ कमंडलु व ५ विभूति , या पांच वस्तु वीरशैव संप्रदायांत दीक्षाविधीस लागतात . त्यांसहि पंचमुद्रा म्हणतात . ( ई ) ( योगशास्त्र ) १ चाचरि , २ भूचरी , ३ अगोचरी , ४ खेचरि आणि ५ अलक्ष्य . ( क . क . स्तबक ८ )
पंच मूल - ( अ ) १ शालपणीं , २ पृष्टिपणीं , ३ रिंगणी , ४ डोरली व ५ गोखरूं ( लधुपंचमूल ), ( आ ) १ वेल , २ ऐरण , ३ टेंटू , ४ पाडळ व ५ शिसव , ( बृहत्पंचमूल ), ( इ ) १ शतावरी , २ विदारिकंद , ३ जीवंती , ४ पाषाणी व ५ जीवक , ( ई ) १ गंधाणागवत , २ हला , ३ अश्वदंष्ट्रा , ४ शिरीष व ५ कासमिंदा ( तृणपंचमूल ). ( उ ) १ शर , १ इक्षु , ३ दर्म , ४ कसई व ५ साळी भात ( तृणपंचमूल ). ( ऊ ) १ जीवक , २ ऋषभक , ३ मेद , ४ महामेद व ५ जीवन्ती . ( ए ) १ पुनर्नवा , २ बला , ३ एरंड , ४ रान उडीद व ५ रानमूग , ( ऐ ) १ गोखरूं , २ लहान बोरी , ३ इंद्रवारुणी , ४ कासविंदा व ५ शिरस . ( ओ ) १ गुळवेल , २ मेडशिंगी , ३ उपलसरी , ४ विदारिका व ५ निशा ( वल्लीपंचमूल )
( म . वा . को . )
पंच मुळें - १ डाय ( दाय ), २ डोला , ३ रिंगणी , ४ रानबांगीं आणि ५ गोक्षुर यांस आर्यवैद्यकांत पंचमुळें म्हणतात .