चला रे सखयांनो ॥ जाऊं मोरेश्वरा ॥
पाहूं त्या सुंदरा मोरयासीं ॥१॥
आह्मी गेलों मोरेश्वरा ॥ (दवे) देखिला मोरया ॥
सेंदूर डवडवीला घवघवीत ॥२॥
अहो घवघवीत रुप ॥ रुप देखिले म्यां डोळां ॥
त्याच्या पायां वेळोवेळां लागूं आतां ॥३॥
अहो आतां एक करुं ॥ जाऊं मोरेश्वरा ॥
त्याचें ध्यान धरुं रात्रंदिवस ॥४॥
अहो रात्रंदिवस जप ॥ जप करुं मोरयाचा ॥
सकळा सिद्धिचा हाचि दाता ॥५॥
अहो दातारु आमुचा ॥ होसिल (मोरेश्वरा) विघ्नहारा ॥
लिंब कोण करा मोरयासीं ॥६॥
अहो मोरया हो माझी ॥ मंगलाची नीधी ॥
त्रिभुवन वेधी लावियेलें ॥७॥
अहो लावियेलें आम्हां ॥ आपुली हीं सोय ॥
मोरया गोसावी दास तूझा ॥८॥