येक भाव धरुनि जाई तूं प्राण्या ॥ शरण जाई गजानना ॥
भव दुःख तुझे होई नाशना ॥ मग मुक्तिपद जोडियेले ॥१॥
संसारा येउनी काय त्वां केलें ॥ गणराज पाय अंतरले ॥
काय त्वां प्राण्या जोडियेलें ॥ व्यर्थ तुझें जिणें वायां गेलें ॥२॥
माझें माझें करितां ठकलासि मुखी ॥ कोण तुज सोडविल दुःखा ॥
नाम एक तारिल फुका ॥ उद्धरिले देखा कर्म संगी ॥३॥
आपुले हिता तूं कारण ॥ एक निष्ठा धरुनि मन ॥
वेगें तुझे होईल कर्म छेदन ॥ मग जन्म मरण नाहीं तुज ॥४॥
ऐसा एकजना उपदेश केला ॥ गणराज पायीं लक्ष तुम्ही लावा ॥
चिंतामणी म्हणे स्वामी माझी सेवा ॥ नाहीं तुम्हा भय यातायाती ॥५॥