मोरया मोरया मोरया ॥ जप आजि करा ॥
धांवोनियां जाऊं तेथें ॥ पाहूं मोरेश्वरा ॥१॥
गणेश तीर्थ हें उत्तम ॥ स्नान करुं तेथें ॥
मग जाऊं देउळांत ॥ पुजूं देवराया ॥२॥
देव भक्त हे पाहिले ॥ धरिले हृदयीं तेची ॥
भेद तोचि नाहीं त्यास ॥ आतां सांगूं (बोलूं) कांहीं ॥३॥
मोरया गोसावी दातार ॥ जांई मोरेश्वरा ॥
तेणें आनंद हा होय ॥ मोरेश्वर पाहा ॥४॥
ऐसी आनंदाची गोडी ॥ हृदयीं न माये तेची ॥
ठक पडोनियां तेथें ॥ गोडी लागे त्याची ॥५॥
चिंतामणी दास तुझा ॥ वेधू लागे तया ॥
ह्मणुनिया धांवें तेथें पाहें मोरेश्वरा ॥६॥