माझ्या स्वामीचे भोगविलास रे ॥
चला जाऊं पाहूं त्या मोरयास रे ॥
चारी दिवस चरणीं करुं वास रे ॥
दर्शन झालिया पातका होईल नाश रे ॥माझ्या स्वामी० ॥धृ॥१॥
रत्नजडित मुगूट शोभिवंत रे ॥
स्वामी माझा बैसला देऊळांत रे ॥
मोरयागोसावी पूजा करितो रे ॥
त्यांचें हृदयीं नांदतो सतत रे ॥माझ्या स्वामी० ॥२॥
एके नारी ती पूजा घेऊनी हातीं रे ॥
एके नारी आणिल्या पुष्प याती रे ॥
चंपक बकुले मोगरे मालती रे ॥
महाराजांची पूजा बांधिती रे ॥माझ्या स्वामी० ॥३॥
बावन चंदनाची शोभिवंत उटी रे ॥
नवरत्नांचा हार शोभे कंठीं रे ॥
मृगनाभीचा टिळकू लल्लाटी रे ॥
गोरा सेंदुर झळकतो भृकुटीं रे ॥माझ्या स्वामि० ॥४॥
जाई जुई अबया नागचाफे रे ॥ पारिजातक कमळें शोभती घोप रे ॥
भक्त भ्रमर होउनी जाताती झोपीं रे ॥
सदा आनंद मोरयाचे कृपें रे ॥माझ्या स्वामि० ॥५॥
भक्त जन द्वारें करावया जाती रे ॥
स्वामि माझा उभा तो देऊळांत रे ॥
अमृत दृष्टीं करुनी न्याहाळितो समस्त रे ॥
त्याचे कृपेनें भाग शीण जातो रे ॥माझ्या स्वामि० ॥६॥
भक्त भ्रद त्याचीं द्वारें करिती रे ॥
मोरया गोसावी दिंडी घेऊन हातीं रे ॥
भाग्यवंत तेथें हरिकीर्तन गाती रे ॥
सकळ जन तेथें लोटांगणी येती रे ॥माझ्या स्वामि० ॥७॥
तिन्ही द्वारें करुनि मुक्ताईस जाती रे ॥
मुक्ताबाई वंदोनिया महाद्वारा येति रे ॥
पंचतत्वाच्या आरत्या ओवाळिती रे ॥
त्यासि तात्काळ प्रसन्न गणपती रे॥माझ्या स्वामि० ॥८॥
ऐसा आनंद होतसे मोरेश्वरीं रे ॥
मोरया गोसाव्याच्या खेळत असे घरीं रे ॥
भक्त जनासी प्रसाद देतो झणी रे ॥
निज भक्ता देई परि पूर्ण परी रे ॥माझ्या स्वामिचे० ॥९॥