जय जय हो (आहो) जय गणनाथा ॥
तुजवीण कोण सोडविल येकदंता ॥
येई येई तूं (आहो) येई गजानना ॥
उशीर नलावी तुज भाकितों करुणा ॥
दुष्ट भोगाची काय सांगूं गति ॥
भोग भोगितों सांगतों तुज प्रति ॥१॥
प्रपंचे वेष्टिलें (आहो) काय म्यां करावें ॥
तुजवीण म्यां कवणा सांगावें ॥
उपेक्षा माझी तूं (आहो) न करी उदारा ॥
तुज विनवितों मी मोरेश्वरा ॥२॥
जन्मो जन्मीच्या (आहो) होत्या पुण्यराशी ॥
तरी मी पावलों तुझिया चरणासीं ॥
चरणीं लाविलें (आहो) देवाजी पुरवीच ॥
आतां कासया तू चाळविसी मज ॥३॥
गर्भवास म्यां (आहो) सोसिले बहुत ॥
आतां तुझिया मी आहे निश्चित ॥
धांवण्या माझ्या तूं उशिर न लावी ॥
तुज वीण काय मी देहा न ठेवी ॥४॥
ऐसी विनती हो परिसे गणपती ॥
तुज म्हणतों राहे माझे चित्तिं ॥
विनवी दास हो म्हणे चिंतामणी ॥
रात्रंदिवस मा तुझे चरणीं ॥५॥