सखि सांगे सखे प्रति (आहो) स्वप्न देखिलें रात्रीं ॥
शेंदुर चर्चिली मूर्ती देखिली डोळा बाप ॥
तयावरि पुसे बाळा (आहो) कैसा भासला डोळा ॥
मजप्रति सांगे वेळो वेळा प्राण सखये ॥१॥
एकदंत लंबोदर (आहो) कांसें पितांबर ॥
भाळीं मनोहर शोभला टिळा (त्यांचे) ॥
सुंदर नयन दोन्ही (आहो) कुंडलें शोभति कानि ॥
रत्न माणिक जोडुनि माथा मुगुट शोभे ॥२॥
फरश कमळ करीं (आहो) मोदकें पात्रभारी ॥
अंकुश शोभे करीं वरदहस्त (त्याचे) ॥
सर्वांगीं सुगंध (आहो) दोंदावरीं नागबंध ॥
विद्याचतुर्दश आनंद करिती तेथें ॥३॥
जडित सुलक्षण (आहो) नवरत्न भूषण ॥
बाहुबाहिवट कंकण शोभति करिं ॥
नानापरिचे पुष्प ज्याति (आहो) जाई जुई शेवंती ॥
चाफे मोगरे मालती कंठी रुळति माळा ॥४॥
चरण वांकि तोडरु (आहो) घागर्या झणत्कारु ॥
तये ठायी आधारु भक्तजन ’बाप’ ॥
मोरया गोसावी दास तुझा (आहो) करितां देखिला पूजा ॥
देखूनि पुरला माझा मनोरथ ’बाप’ ॥५॥