दुर्घट संसारी हो कष्टलो बहु भारी ॥
एकदा भेटी तूं लवकरी हो देई मज ॥१॥
प्रपंचाची माया हो लाविलीस देवा ॥
भजन तूझी मज सेवा हो न घडेची ॥२॥
कोणाचा प्रपंच हा कां मज लाविला ॥
चरण तूझे मज अंतरले रे मोरेश्वरा ॥३॥
मनुष्य देही बहू हो भोगितो बहु कष्ट ॥
पाप आहे रे उत्कट मी काय (बोलू) करु ॥४॥
आणिक एक विनंती हो परीसे तूं गणपती ॥
आपुला छंदा मंगलमुर्ती हो लावि मज ॥५॥
पापांत ठेविले हो पाप कीती भोगु ॥
कृपा मज करी तूं सनाथा रे माय बापा ॥६॥
माझिये मानसि हो लागली बहू आशा ॥
भेटि देई तूं विघ्नेशा हो दिनालागी ॥७॥
दिधली त्वां मज आशा हो न करी तूं निराशा ॥
आहे तूझा मज भरवसा रे (मायबापा) मोरेश्वरा ॥८॥
अझुन किती भोग हो भोगू मी दातारा ॥
कृपा (दया) तुज उपजेना उदारा मी काय (बोलू) करु ॥९॥
येई तूं लवकरी हो शिणलो मी बहुभारी ॥
आरुढ मुषकावरी हो दिनालागी ॥१०॥
करुणा तुज भाकितो हो अखंड ध्नानीमनीं धरीले दृढ मनी हो चरण तूझे ॥११॥
करुणेचि वचने निवेदितो चरणी ॥ दास चिंतामणी हो विनवितो ॥१२॥