नमीला श्रीगुरु मोरया गोसावी ॥
त्यासी अष्टभावे हो प्रणी पात ॥१॥
आहो प्रणीपातः करितो तुज बा गुरुराया ॥
नेणें आणिक दुजा हो तुजवाचोनी ॥२॥
आहो तुजवाचोनी नाहीं कर्म हा छेदक ॥
तोडिसी भवदुःख हो क्षणमात्रे ॥३॥
आहो क्षणमात्रे तारिले पापी हे उत्कृष्ट ॥
म्हणूनी नाम प्रगट हो त्रयलोकीं ॥४॥
आहो त्रैलोकीं प्रसिद्ध असे विघ्नराज ॥
भक्त भवार्णवी हो तारियेले ॥५॥
आहो तारियेले जीव संख्या नाहीं त्यासी ॥
माउली भक्तासि हो कृपाळु हे ॥६॥
आहो कृपाळु ह्मणविसी मज कां उपेक्षिसी ॥
माझी सर्व लाज गा आहे तुज ॥७॥
तुज देवराया करितो विनवणी ॥
निष्ठूर तूं मनिं हो ग धरी देवा ॥८॥
देवराया स्वामि अवतार धरीला ॥
रहीवास केला हो कर्हेतीरी ॥९॥
कर्हेतीरी स्नान करितिल पापीजन ॥
मग घेती दर्शन हो तुझे वेगीं ॥१०॥
वेगी येती प्राणी तुज लोटागणी ॥
धन्य त्याची जननी हो येऊनिया ॥११॥
येऊनिया प्राण्या साध्य तुह्मी साधा
एकवेळ वेधा हो मोरेश्वर ॥१२॥
मोरेश्वर पायीं वृत्ति लीन करा चुकतिल वेरझारा हो पळमात्रे ॥१३॥
पळपळ तुझे जात असें वृथा ॥
आयुष्य भरंवसा हो नको धरु ॥१४॥
धरु नका तुह्मी मायेची संगति ॥
तेणे संगे होतील हो यातायाती ॥१५॥
यातायाती चुकवी स्वहित तूं करी ॥
निर्धारी तूं ध्याई हो चरण त्याचे ॥१६॥
त्याचि प्राप्ति तुह्मी करा हो सकळ ॥
घडेल केवल्य हो वास तूह्मा ॥१७॥
तुह्मासी पडला कां रे अंधःकार ॥
संसार दुस्तर हो चुकेल कैसा ॥१८॥
कैसा तुह्मा नाहीं मायेचा कंटाळा ॥
तेणे वेळोवेळा हो दुःख होय ॥१९॥
होईल जाचणी गर्भाची भोगणी ॥
कटविली जननी हो येउनिया ॥२०॥
येउनि संसारा मोरया पाहूनि ॥
दास चिंतामणी हो विनवीतो ॥२१॥