कामधेनु
आहो कामधेनु गाय मोरया हो माय ॥
हूंबरोनी पाहे कैसी आली ॥१॥
आहो कोंडा दारवंटा असों द्या वाडयांत ॥
हृदय मंदिरांत माझें घरीं ॥२॥
आहो सुकृत सामुग्री असईल जरीं ॥
मिळवण करी इस घाला ॥३॥
आहो पंचरसाची चरवी मन (चित्त) धरा हातीं ॥
दोहा बरव्या रीतीं कामधेनू ॥४॥
आहो बैंसें सावचित्त कांसें घाली हात ॥
नाहींतरी लाथ देईल झणी ॥५॥
माझ्या भय वाटे मनासीं ॥ हात घालू कैसी ॥
तिखट शिंगासी बोलू नये ॥६॥
आहो धार धरी नेटका । (मनची सांडी शंका ॥
पान्हा येईल मुर्खा पाहे आतां ॥७॥
आहो पान्हा जो दाटला झरारु सूटला ॥
तनूमन सोडा वत्स इचे ॥८॥
माझ्या बळीयाड मनीचे देह सत्व गुणाचे ॥
अमृत स्तन पितें त्यासी फावे ॥९॥
आहो पुरवील ठेवा बरवें आचरण ॥
कामधेनु तया घरीं दुभे ॥१०॥
आहो मिस्किण गाऊली निजभक्ता माऊली ॥
अमृत वोळली आली येथें ॥११॥
आहो रोहेंमोहें रस कुर्वाळुनी हाते ॥
पान्हा जो गणनाथे घातिलासे ॥१२॥
आहो ऐसी कामधेनु आहे चिंचवडी (आहे मोरेश्वरीं) ॥
मोरया गोसावी दास तुझा ॥१३॥