अकळु अवतार कर्हे पाठारीं ॥ ब्रह्म कमंडलु गंगा ॥
रहिवास तयें तिरीं ॥ भीमकुंड गणेश तीर्थ ॥
तेथिल महिमा थोर ॥ तेथें केलिया पैं स्नान ॥
कर्मा (दोषा) नाहीं ऊरी ॥ जय जय जय जय जय लंबोदरा ॥
सकळा सिद्धिचा तूं दाता होसिल विघ्नहरा (मोरेश्वरा) ॥१॥
तुझें केलिया भजन (पूजन) चुकतिल वेरझारा ॥
तूं भक्त जन वत्सल कृपाळू बा मोरेश्वरा ॥२॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थिसी ॥ चार्ही द्वारें केलिया मुक्ति होय ॥
चारि दिवस उपवास करोनिया चारि पाहे ॥
एक निष्काम करिती सायुज्यता होय ॥
एक कामना इच्छिती इच्छाफळ (पूर्वफळ) देते आहे ॥३॥
पूर्वद्वारीं ती मांजराई आदिशक्ति माया ॥
दक्षिणद्वारीं ती आसराई भवानी मोहंमाया ॥
पश्चिमद्वारीं ती वोझराई माता वंदुनिया ॥
उत्तरद्वारीं होय मुक्ति मुक्ताबाई देखिलिया ॥४॥
माहाद्वारीं ती कृपाळु माता गवराई ॥
दृष्टि सन्मुख जननीं जवळी उभा भैरवभाई ॥
वृक्ष उत्तम वामभागीं आदिस्थान तये ठाई ॥
वृंदा वनीचा महीमा तो मी वर्णू (बोलू) कांई ॥५॥
ऐसा परिवार सहित मयुर पुरीं (गांवी) आहे ॥
भक्त येतील यात्रेसी तयाचें चित्त (मन) पाहे ॥
मोरया गोसावी दास तुझा तज ’नित्य’ (जवळी आहे) ध्याये ॥
प्रतिमासी दर्शन लोटांगणी (येतो आहे) जाये ॥ जय जय० ॥६॥