स्वप्न देखिलें नयनीं हो रात्रिच्या पै वेळीं ॥
(महाराजा) विघ्नेश माउलि म्यां देखियेली ॥१॥
बहुत पुण्याचि बांधणी परी देखिली नयनीं ॥
(महाराजा) आतां यासि मन हो नविसंबे ॥२॥
पांवे पावें तूं मोरया हो माझिया धांवण्या ॥
(महाराजा) तुजवीण देवराया मज कोणी नाहीं ॥३॥
नविसंबे तुज हो देवा आपुलीया काजा ॥
(महाराजा) चरण तुझे वोज मी ध्यातों आहे ॥४॥
मयुरपूरीं वास त्वां केला गजानना ॥
(महाराजा) भक्तांच्या कामना तूं पुरवीसी ॥५॥
ज्या जैसी वासना हो तैसा तूं रे देसी ॥
(महाराजा) ह्मणोनि पायासि हो भजताति ॥६॥
क्षणक्षणा तुज ध्याति अवघा मंगलमूर्ती ॥
(महाराजा) तया देह गति ही नाहीं कदां ॥
माझें वेधलें हें मन हो लागलें तुझें ध्यान ॥
(महाराजा) ह्मणोनी शरण तुज आलों आसे ॥८॥
येई तूं उदारा हो गणराजा सुंदरा ॥
(महाराजा) ध्यान मोरेश्वरा मज लागलेसे ॥९॥
रुप देखिलें सुंदर हो विघ्नेश मनोहर ॥
(महाराजा) तयासी म्यां वर हो मागितला ॥१०॥
प्रसन्न तूं हो रे भक्ता होईं रे गणनाथा ॥
(महाराजा) त्यासि जन्मपथ हो नाहीं कदां ॥११॥
मोरयागोसावि मज निधान लाधले
(महाराजा) त्याचेनें कृपेनें तुज देखियेलें ॥१२॥
तनुमन लागले हो तुझ्या हो चरणीं ॥
(महाराजा) दास चिंतामणी तुज ध्यातों आसे ॥१३॥