येई तूं धावण्या देवा माझ्या कुढावया ॥
(कोठें) गुंतलासि देवा हो विसरलासी ॥१॥
देवा पडिलों मी संसारीं ॥ दुःख मायेच्या लहरी ॥
भोग झाले मज भारी हो येई वेगीं ॥२॥
करुणा वचनीं विनवीतो ॥ नाम तुझें मी मागतों ॥
आणिक नलगे मज कांहीं हो : तुज वाचोनी ॥३॥
सर्व आहे रे हे मिथ्या ॥ ठकले जन हे दखतां भ्रांति पडली त्या मुर्खा हो माया संगे ॥४॥
माया संगतिची गोडी ॥ नलगें मज सर्व जोडी ॥
बापा तुज मी न सोडी हो कृपावंता ॥५॥
अवघे आहे दुःख मूळ ॥ देहे बाप हें समूळ ॥
चरण तुझे हें निर्मळ हो धरिले वेगीं ॥६॥
विषय संगतीच्या फळे ॥ मज अंतर पडलें ॥
त्रास उपजला या देहीं हो विषय नको ॥७॥
रात्रंदिवस घडल्यासाठीं ॥ अवघ्या गेल्या देवा कष्टी ॥
जन्मा येउनिया सृष्टी हो भार केला ॥८॥
काम क्रोध मद मत्सर ॥ याचि जाचणी बहु फार ॥
याच्या भये रे विसरलों तुजलागीं ॥९॥
जन्मीं आहे दुःख प्राप्ती ॥ शिण सांगावा म्यां किती ॥
कष्टविले मंगलमुर्ति हो क्षमा करी ॥१०॥
मागें तुज मी रे एक ॥ भक्ता तारीं तूं अनेक ॥
चिंतामणी तुज ध्यातो हो अहर्नीशी ॥११॥