मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
आतांचि बापा सावधान होईं ल...

मोरया गोसावी - आतांचि बापा सावधान होईं ल...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


आतांचि बापा सावधान होईं लक्ष लावीं गजाननी रे ॥

कां रे तूं प्राण्या विषयीं गुंतलासी ॥ शरण जाई विघ्नेशीं रे ॥

आजून कां रे व्यर्थचि नाडिसी ॥ सोडवण करी देहासी रे ॥

आपुले ठायीं मी तूं पण आणसी ॥ मग तूं दिनरुप होसि रे खेळया ॥१॥

कासया घेसी हातीं जपमाळा ॥ देह शुद्ध नाहीं झाला रे ॥

वस्त्रें टाकूनी वेष बदलिला ॥ काय चाड तुजला रे ॥

बाह्य दाखऊनी आपलें जना ॥ अंतर शुद्ध नाहीं झालें रे ॥

व्यर्थचि दाखऊनी जन भुलबीलें ॥ आपुलें हित नाहीं केलें रे खेळया ॥२॥

कां रे तुज अज्ञान पडलें ॥ हित देख आपूलें रे ॥

पुत्र कलत्र धन संपत्ति ॥ तुझी तुला नवती रे ॥

असत्य वदोनी पापें भरसी ॥ बांधूनी नेती यम पाशीं रे ॥

म्हणोनी कांहीं ठेवा ठेवी करी ॥ भजे (महाराज) गणराज पायीं रे खेळया ॥३॥

देहाचा भरंवसा न धरी कांहीं ॥ नलनिवर जळ पाहिं रे ॥

तैसें जिवित्व आहेच प्राण्या ॥ म्हणोनी सावधान होई रे ॥

आयुष्य भरवश्यानें नाडिलें बहूत ॥ त्याचेच कांहीं नव्हती रे ॥

तयास झाल्या गर्भवास यातना ॥ दृढ भज येकदंता रे खेळया ॥४॥

नवच भास कष्ट भोगुनि मग आलें बाळपण रे ॥

दोन चार वर्षें तिहीं गेलीं ॥ मग आलें प्रौढपण रे ॥

आपपणा तो नाठवी तरुण ॥ वासना धरि विषयाची रे ॥

तरुणपण गेलें वृद्धपण आलें ॥ मग तुज आहे कोण रे खेळया ॥५॥

आयुष्य त्वां रे व्यर्थचि दवडिलें ॥ कोण सोडवील तूजला रे ॥

येऊनि काळ घालतो फासा ॥ मग होसिल बापुडा रे ॥

गर्भवासाची नसेल उरी ॥ तरी भजे मोरेश्वरी रे ॥

गजानन विनवी दास चिंतामणी ॥ लक्ष लावी चरणी रे खेळया ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP