प्रथम नमू देव लंबोदरु ॥ जो ऋद्धिसिद्धिचा दातारु ॥
वेदाश्रुति शास्त्रासि जो आधारु ॥ तो (महाराजा) गणराजा नमियेला ॥१॥
रंगी उभी सारजा घन ॥ पुस्तक वीणा करि घेउन ॥
सानु सानुध्वनी उमटति जाण ॥ गंधर्व गायन करिताती ॥२॥
तया माजी उभे नारद तुंबर ॥ मृदंग वाजति धिमि धिमि कार ॥
ठाळांचा आहे महा गजर ॥ रंगी मोरेश्वर (कीडताती) खेळताती ॥३॥
गणनायक नृत्य करित ॥ धिमि धिमि भूमि दणाणींत ॥
गिरि गिरि गिरि भवरे देत ॥ थाक तोडि ताल छंदे ॥४॥
ऐसें तांडव नृत्य मांडलें ॥ विमानी देव तटस्थ राहिले ॥
मोरया गोसावी योगि बोलले ॥ रंगि भेटले (महाराजा) गणराज ॥५॥