मोरेश्वर गांव बरवा ठाव ॥ तेथें नांदतो मोरया देव ॥
तयाच्या ठायां जा रे एक भावें ॥ कृपा करिल मनिं दुजें न धरावें ॥१॥
चला रे भाईनों जाउं त्या ठायां ॥ नाचत नाचत पाहुं मोरया ॥धृ.॥
कर्हेच्या पाठारीं नांदे इच्छादानीं हो ॥ आणिक दैवत मी न देखें लोचनी हो ॥
तयाच्या ठायां जा रे लोटांगणि हो ॥ झणि वरी पहा तुह्मी आपुले नयनीं हो ॥२॥
कामना टाकुन तुह्मी भजा येकदंत हो ॥ निष्काम भजा तुह्मी ध्या रे गपणती हो ॥
कामनेची आस नका भजा मोरेश्वरीं हो ॥ निष्काम भजाल तुह्मी जाल मुक्तिद्वारा हो ॥३॥
कामना इच्छाल तरी होईल एक प्राप्ती हो ॥ निष्काम भजाल तुह्मा होईल नाना प्राप्ती हो ॥
अंती तुह्मा भय नाहीं देह उत्तम गती हो ॥ कृपा करिल तो भजा सर्वार्थीं हो ॥४॥
भाद्रपद मास आला उल्हासलों मनीं हो ॥ वेगिं भेटि द्यावी भक्ता त्वरित हो ॥
तुजवीण भक्त जाले सकळ अनाथ हो ॥ येति तुझ्या ठायां होति सनाथ हो ॥५॥
भाद्रपद मासाचे ठायीं चाललों यात्रेसी हो ॥ ध्वजा पताका आनंदे मिरवती हो ॥
मोरया मोरया नाम गर्जताती हो ॥ धन्य त्याचें भाग्य देह उत्तम गती हो ॥६॥
आलों लवलाहीं देखिलें कर्हा तिरीं हो ॥ स्नान करुनी तेथें झालों निर्मळ हो ॥
दंडवत चालिलों आह्मीं देउळांत हो ॥ देखिलीं पाऊलें झालों सुस्नात हो ॥७॥
टिपुरि घालीतो तुझे महाद्वारीं हो ॥ आनंदले भक्त कैसे नाचती गजरें हो ॥
लडिवाळ तुझे कैसे खेळती रंगणी हो ॥ आपण गणराज स्वयें खेळ पहाती हो ॥८॥
टिपूरी खेळतां माझें झालें समाधान हो ॥ आपण पहाती स्वयें गजाननीं हो ॥
चिंतामणी दास म्हणे लीन तुझ्या चरणीं हो ॥ चरणापासूनीं आणिक ठायां न ठेवीं हो ॥
चला रे भाईनों जाउं त्या ठायां ॥ नाचत नाचत पाहू मोरया ॥९॥