गजानन माझा शिव रुप जाला ॥
विश्व म्यां पाहिला हो आजि डोळां ॥१॥
अहो सिद्धी बुद्धी दोन्ही गंगा गौरी जाणा ॥
दशभूज तोहि हो देखिला हो ॥२॥
अहो आयुधें सहीत दशहरती जाणा ॥
नंदी हा मूषक हो शोभे त्याला ॥३॥
अहो ऐसा गणराज विश्व म्यां पाहिला ॥
तात्काळ हा झाला हो विष्णु तोचि ॥४॥
अहो चतुर्भूज तोहि सिद्धि हा सहित ॥
अंकुश फरश हो चक्र गदा ॥५॥
अहो गरुडवहान मयूर येथें शोभे ॥
लक्ष्मी नारायण हो ह्मणती त्याला ॥६॥
अहो ऐसें तेही नाम सिद्धिविनायक ॥
ऐसें त्रिगुणात्मक हो रुप त्याचें ॥७॥
अहो शिव विष्णु तेही रुप हें धरुन ॥
साजतील तिन्ही हो गणराजा ॥८॥
अहो मोरया गोसावी ॥ कृपा (दया) मजवर केली ॥
तेणें स्फुर्ति झाली हो बोलावया ॥९॥
अहो अज्ञान बोबडें चिंतामणी वर्णीं ॥
मोरयासी रंजवी हो वेळोवेळां ॥१०॥