विकृति करण्याचा जो सामान्य निर्णय सांगितला, त्याला अनुसरूनच पर्वदिवशी अथवाशुक्लपक्षातल्या देवनक्षत्री, काम्येष्टि कराव्या. स्त्री बाळंतीण झाली असता जरी जातेष्टि करावी असे आहे, तरी कर्माला प्रतिबंध करणारे जे वीस दिवसपर्यंतचे सोयर (जननाशौच) ते संपल्यानंतर, पर्वदिवशी, ती करावी. घर जळाले असता गृहदाहेष्टि करावी. अशा प्रकारच्या नैमित्तिक इष्टींच्या अनुष्ठानांना पर्वादिकांची आवश्यकता नाही. अशा इष्टि, असंभव असल्यास पर्वदिवशी कराव्या. यज्ञाच्या अंगभूत असणार्या ज्या नित्य इष्टि,त्या यज्ञाबरोबरच कराव्या. त्यांच्याकरिता निराळ्या काळाची जरूर नाही. होमद्रव्ये जर दोषयुक्त झाली, तर त्याबद्दल करायच्या ज्या यज्ञप्रायश्चित्तेष्टि, त्या स्विष्टकृत कर्मानंतर व समष्टियजुसंज्ञक होमाच्या आधी जर दोषाची आठवण झाली तर, त्या वेळीच तंत्रोपजीवनाने निर्वापादिक कराव्या. दोषाची आठवण जर प्रायश्चित्ताच्या आहुतीनंतर झाली, तर तो सर्व प्रयोग पुरा करून, त्या इष्टि, पुन्हा अन्वाधानिक विधीने कराव्या. याप्रमाणे येथे काम्येष्टिकालनिर्णयाचा एकोणतिसावा उद्देश संपला.