ग्रहणाच्या प्रहराच्या आधी सूर्यग्रहणाचा वेध चार प्रहर असतो. दिवसाच्या पहिल्या प्रहरात जर सूर्यग्रहण असेल, तर आदल्या दिवसाच्या रात्रीच्या चार प्रहरात जेवू नये. ग्रहण जर दुसर्या प्रहरात असेल, तर आदल्या रात्रीच्या दुसर्या प्रहरापासून जेवण वर्ज्य. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण जर पहिल्या प्रहरात असेल, तर दिवसाच्या दुसर्या प्रहरापासून भोजन वर्ज्य करावे. हेच ग्रहण जर रात्रीच्या दुसर्या प्रहरी असेल, तर दिवसाच्या तिसर्या प्रहरापासून जेवणाचा त्याग करावा. बाल, वृद्ध व रोगी यांच्यासंबंधाने दीड प्रहर किंवा तीन मुह्र्त म्हणजे सहा घटका समजावा. सशक्ताने जर वेधात जेवण केले तर त्याने तीन दिवसांच्या उपासाचे प्रायश्चित्त करावे. ग्रहणांत जेवण केल्यास प्राजापत्य-प्रायश्चित्त करावे. ग्रहण लागले असताना जर चंद्रोदय होईल, तर चार प्रहर वेध असतो, म्हणून आदल्या दिवशी जेवू नये. खग्रास चंद्रग्रहण असल्यास चार प्रहर वेध आणि एक देशग्रास असल्यास तीन प्रहर वेध असतो असे काही ग्रंथकार म्हणतात. चंद्रग्रहण खग्रास असताच जर चंद्रास्त होईल, तर 'ग्रहण असून जर चंद्र व सूर्य हे अस्त पावतील, तर दुसर्या दिवशी उदयाच्या वेळी स्नान करून, शुद्ध होऊन मनुष्याने व्यवहार करावा' असे वचन आहे. येथे स्नान करून शुद्ध व्हावे, असे म्हटले आहे यावरून, शुद्ध मंडळाच्या दर्शनाच्या वेळी जे स्नान करायचे, त्याच्या आधी शुद्धि नाही असे सांगितले आहे, म्हणून पाणी आणणे, सैपाक करणे वगैरे जे करणे ते, शुद्ध बिंबाचा उदय झाल्यावर जे स्नान करायचे त्याच्या आधी करू नये असे मला वाटते. सूर्यग्रहण जर ग्रस्तास्त होईल किंवा ग्रस्तोदित होईल तर पुत्रवान् अशा गृहस्थाश्रमी माणसाला उपासाचा निषेध सांगितला आहे; यास्तव त्याने सहा मुहूर्ताचा वेध टाकून, ग्रहणाच्या पूर्वी जेवावे असे कोणी म्हणतात. पुत्रवान् अशा गृहस्थानेही ग्रहणात उपास करावा, असे जे माधवाचे मत, ते शिष्टाचाराला अनुसरून असल्याने, योग्य दिसते. सूर्यग्रहण जर ग्रस्तावस्थेत अस्त पावेल आणि चंद्रग्रहण जर लागलेलेच उदयाला येईल, तर अग्निहोत्र्याने अन्वाधान करून, पाण्याने व्रत करावे आणि जेवू नये. चंद्रग्रहण जरी ग्रस्तास्त असले तरी दुसर्या दिवशी संध्या, होम वगैरे करण्यात दोष नाही. ग्रहण थोड्याच वेळात सुटेल असा जर शास्त्राधार कळला, तर ते सुटण्याच्या वेळेनंतर स्नान करून होमादिक कृत्ये करावीत. फार वेळाने सुटणारे असल्यास होमकाळची वेळ निघून जाते म्हणून, ग्रहण लागलेलेच बिंब उदय पावण्याच्याप्रमाणेच, ग्रस्त स्थितीत अस्त पावलेल्या ग्रहणांतही संध्या, होम वगैरे करून, शास्त्रीय रीत्या ग्रहण सुटण्याचा जो काळ ठरेल त्या काळी स्नान करून, ब्रह्मयज्ञादि नित्य कर्म करावे असे मला वाटते. दर्शश्राद्ध व संक्रांतिश्राद्ध यांची प्रसंगसिद्धि अमावास्येच्या दिवशी ग्रहणनिमित्तक श्राद्ध केल्याने होते. ग्रहणाच्या दिवशी जर पित्रादिक वार्षिक श्राद्ध आले, तर शक्य असल्यास ते अन्नानेच करावे. ब्राह्मणादिक न मिळाल्यास, ते आमान्नाचे किंवा हिरण्यद्वारा करावे.