पूजादि व्रतांना जी शुद्ध प्रतिपदा घेणे असेल, ती अपराह्ण 'सायाह्नकालव्यापिनी असताही ती पूर्वीचीच घ्यावी' असे माधवाचार्य म्हणतात. प्रतिपदा जर अपराह्णव्यापिनी नसेल, तर द्वितीयायुक्त असेल तीच घ्यावी. जी कृष्णप्रतिपदा नेहमी द्वितीयायुक्त असेल ती घ्यावी. उपासाकरिता जी घेणे, ती दोन्ही पक्षात पूर्वतिथीने विद्ध असलेलीच घेणे ग्राह्य आहे. अपराह्णव्यापिनी प्रतिपदेला करायच्या उपासाचा संकल्प सकाळी करावा. संकल्पाच्या वेळी प्रतिपदा जरी नसली तरी, संकल्पात 'प्रतिपद' असेच म्हणावे. 'अमावास्यादि' असे म्हणू नये. 'शुद्ध द्वादशीच उपासाला योग्य आहे' असे ज्या स्थळी सांगितले आहे, त्या स्थळी एकादशीच्या व्रताबद्दल- संकल्प, पूजा वगैरेसंबंधाने- 'एकादशी' असेच म्हणावे; 'द्वादशी' असे म्हणू नये. संध्या, अग्निहोत्र वगैरे इतर कर्मासंबंधाने त्या त्या काळी ज्या तिथीची व्याप्ति असेल तिचाच उच्चार करावा असे मला वाटते. संकल्प करणे तो सूर्योदयापूर्वी उषःकाल करावा. सूर्योदयानंतर करणे झाल्यास, प्रातःकाळातल्या तीन मुहूर्तापैकी पहिले दोन मुहूर्त संपण्याच्या आतच तो करावा; कारण, तिसरा मुहूर्त निषिद्ध आहे. याप्रमाणे येथे सातवा उद्देश संपला.