वर्ष, अयन, ऋतु, महिना, पक्ष व दिवस - असे कालाचे सहा प्रकार आहेत. चांद्र, सौर, सावन, नाक्षत्र आणि बार्हपत्य - असे वर्षाचे पांच प्रकार आहेत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत जे दिवस, त्यांचा एक महिना होतो. याप्रमाणे चैत्रादि बारा महिन्यांचे म्हणजे ३५४ दिवसांचे- आणि अधिक महिना जर असेल तर तेरा महिन्यांचे एक चांद्रवर्ष होते. प्रभव, विभव, शुक्ल इत्यादि साठ संवत्सरांची नावे या चांद्रवर्षाचीच आहेत. सूर्याने मेषादि बारा राशि भोगिले असता, ३६५ दिवसांचे एक सौरवर्ष होते. ३६० दिवसांच्या वर्षाला सावनवर्ष म्हणतात. पुढे जे बारा नक्षत्रांचे वर्ष सांगण्यात येणार आहे, त्याला नाक्षत्रवर्ष असे म्हणतात. ते ३२४ दिवसांचे होते. गुरूने मेषादि बारा राशी भोगिल्या म्हणजे त्याला बार्हस्पत्यवर्ष असे म्हणतात व ते ३६१ दिवसांचे असते. धार्मिक कर्मात चांद्रवर्षाचाच उच्चार करावा; इतर वर्षांचा करू नये. दक्षिणायन व उत्तरायण असे अयनाचे दोन भेद आहेत. सूर्य जेव्हा कर्कादि सहा राशि भोगितो तेव्हा दक्षिणायन होते, व मकरादि सहा राशि भोगितो तेव्हा उत्तरायण होते. सौर आणि चांद्र असे ऋतुंचे दोन भेद आहेत. मीन किंवा मेष यांच्या संक्रांतीपासून दोन राशी सूर्याने भोगिल्या असता, संक्रांतिपरत्वे होणारे जे वसंतादि सहा ऋतु, ते सौरऋतु होत. चैत्रापासून आरंभ करून दोन-दोन महिन्यांचा एकेक असे मासपरत्वे होणारे जे वसन्तादि नावाचे सहा ऋतु, ते चांद्रऋतु होत. अधिकमास जर असेल तर नव्वदांहून काही कमी अशा दिवसांचा चांद्रऋतु होतो. श्रौतस्मार्तादि कर्माच्या संकल्पाच्या वेळी, चांद्रऋतूचाच उच्चार करणे योग्य आहे. चांद्रमास, सौरमास, सावनमास व नाक्षत्रमास असे महिन्यांचे चार प्रकार आहेत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा, अथवा कृष्ण प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा जो महिना तो चांद्रमास होय. असे जरी आहे तरी, शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा महिना मुख्य आहे. कृष्ण प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा महिना विन्ध्याद्रीच्या उत्तरेसच ग्राह्य मानिला आहे. श्रौतस्मार्तादिकांच्या कर्माच्या वेळी, चैत्रादि नावाच्या या मुख्य महिन्याचाच उच्चार करावा. मीनसंक्रातीपासून, संक्रातिपरत्वं होणार्या सौर महिन्यांना चैत्रादिक नावे आहेत, असे कित्येक म्हणतात. एका सूर्यसंक्रातीच्या आरंभापासून पुढच्या सूर्यसंक्रांतीच्या आरंभापर्यंतचा जो महिना, तो सौरमास होय. ३० दिवसांच्या महिन्याला सावनमास म्हणतात. अश्विनी वगैरे सत्तावीस नक्षत्रे चंद्राने भोगिली असता जो महिना होतो, तो नाक्षत्रमास होय. शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पक्ष तो शुद्ध (शुक्ल) पक्ष होय, आणि कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंतचा जो पक्ष तो कृष्णपक्ष होय. एका दिवसाच्या घटका साठ असतात. याप्रमाणे येथे धर्मसिंधुसारचा पहिला उद्देश संपला.