उपासाच्या आदल्या दिवशी सकाळी नित्यकर्म करणे झाल्यावर
'दशमीदिनमारभ्य करिष्येऽहंव्रतं तव । त्रिदिनं देवदेवेश निर्विघ्नं कुरु केशव ।'
असा संकल्प करून मध्याह्नी एकदाच जेवावे. त्याचे नियम येणे प्रमाणेः - काश्याचे भांडे, मांस, मसूर, दिवसाची झोप, पोटभर जेवणे, पुष्कळ पाणी पिणे, दुसर्यांदा जेवणे, स्त्रीसंग, मध; खोटे बोलणे, हरभरे, कोद्र, भाजी, परान्न, सोडत, तेल, तीळ, मीठ, विडा वगैरे सर्व वर्ज्य करावीत. एकभुक्त झाल्यानंतर काटक्यांनी दात धुवावेत. रात्री जमिनीवर निजून एकादशीला सकाळी पाने वगैरेंनी दात घासावेत. काटक्यांनी घासू नयेत. स्नानादिक रोजच्या क्रिया आटपल्यावर हाताच्या बोटात पवित्रके घालून उत्तरेकडे तोंड करावे व पाण्याने भरलेले भांडे हाती घेऊन
'एकादश्या निराहारो भूत्वाहमपरेऽहानि । भोक्ष्यामि पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्युत' ॥
असा संकल्पाचा मंत्र म्हणून, विष्णूला पुष्पांजलि द्यावा. अशक्ताने 'जलाहारः । क्षीरभक्षः । फलाहारः । नक्तभोजी । ' यापैकी शक्त्यनुसार कोणचा तरी शब्द 'निराहारोच्या ऐवजी उच्चारून संकल्प करावा. शैवांनी रुद्रगायत्री संकल्प करावा आणि सौरांनी नेहमीच्या गायत्रीचा संकल्प करावा. सूर्योदयानंतर जरदशमी असेल, तर स्मार्तांनी हा संकल्प एकादशीच्या रात्री करावा. दशमी जर अर्धरात्रीनंतर असेल, तर सर्वांनी एकादशीला मध्याह्नानंतर करावा. संकल्पानंतर अष्टाक्षरमंत्राने तीन वेळा अभिमंत्रण करून, ते पाणी प्यावे. त्यानंतर, फुलांचा मंडप करून त्यात-फुले, गंध, धूप, दीप, उत्तम नैवेद्य, अनेक प्रकारची उत्तम स्तोत्रे, गाणी, कर्णमधुर वाद्ये, साष्टांग नमस्कार, उत्तम प्रकारचे जयशब्द वगैरेनी विधिपूर्वक हरीची पूजा करून, रात्री जागरण करावे.