संगवकालानंतर तेराव्या घटकेपासून आरंभ करून अर्ध्या दिवसाच्या पूर्वी जर संधि असेल, तर त्या सद्यःकाला पौर्णिमा होते. त्या पौर्णिमेत संधिदिवशीच अन्वाधान करावे,व लगेच याग करावा. काहीचे असे म्हणणे आहे की, पौर्णिमेचे हे सद्यत्कालत्व वैकल्पिक आहे. अमावास्येत नेहमी दोन काल असतात. सद्यःकालत्व कधीच नसते. पौर्णिमेत आणि अमावास्येत अपराह्णसंधि असताना प्रतिपदेच्या चौथ्या पादात जर याग केला, तर दोष नाही. अमावास्येत अपराह्णसंधि असताही प्रतिपदेला जर तीन मुहूर्तापेक्षा अधिक द्वितीयाप्रवेश असला, तर चंद्रदर्शनाचा संभव असल्याने आणि चंद्रदर्शनात याग करू नये असे सांगितले असल्याने, अमावास्येलाच इष्टि आणि चतुर्दशीला अन्वाधान, ही कृत्ये बौधायनादिकांनी करावीत. अमावास्येत जर सात घटका प्रतिपदा नसेल, तर चंद्रदर्शन असताही प्रतिपदेला बौधायनादिकांनी इष्टि करावी. संधिदिवशी जेव्हा इष्टि असेल, तेव्हा ती प्रतिपदेलाच करावी, पर्वाच्या दिवशी करू नये. यागसमाप्ति जर पर्वाच्या दिवशी झाली, तर याग पुन्हा केला पाहिजे. स्मार्तांच्या स्थालीपाकासंबंधाने याप्रमाणेच निर्णय जाणावा. 'स्मार्तांनी स्थालीपाक प्रतिपदेला संपवावा असा नियम नाही. स्थालीपाकाची समाप्ति पूर्वाह्णी करून, संधीनंतर प्रतिपदेला ब्राह्मणभोजन मात्र करावे. संधीच्या जवळचा जो प्रातःकाळ, त्या वेळीच स्थालीपाक करावा, असा नियम जयंताने देखील सांगितला आहे' असे कित्येक ग्रंथकार सांगतात. या बाबतीत पुरुषार्थचिंतामणीचे असे मत आहे की, श्रौतकर्मातसुद्धा ब्राह्मणभोजन तेवढे प्रतिपदेला करून, बाकीचे सारे तंत्र पूर्वाह्णीच पुरे करावे, त्याला प्रतिपदेची आवश्यकता नाही. पौर्णिमेच्या इष्टीचा जो निर्णय पूर्वी साधारणपणे सांगितला, तोच कात्यायनांचा समजावा. त्याबद्दल विशेष असे काही नसल्याबद्दल निर्णयसिंधु वगैरे ग्रंथाची संमति आहे. या पौर्णिमेच्या बाबतीत काही जण कात्यायनांचा असा निर्णय सांगतात की, संधीच्या दिवशी पूर्वाह्णसंधि असताना अन्वाधान करावे आणि दुसर्या दिवशी याग करावा.