पक्षाचे शेवटचे दिवस उपासाचे आणि पहिले दिवस यागाचे होत. उपास म्हणजे अन्वाधानाचे कर्म होय. पर्वाचा चौथा अंश व प्रतिपदेचे पहिले तीन अंश यांना यागकाल म्हणावे. हा जो प्रातःकाल तो विद्वानांनी सांगितला आहे. प्रतिपदेच्या चौथ्या चरणात याग करू नये अशी स्थिति (म्हणजे वहिवाट) आहे. प्रतिपदा आणि पर्व ही दोन्ही जर पूर्ण असतील, तर तेथे शंकाच राहात नाही; कारण, पर्वाच्या दिवशी अन्वाधान करावे आणि पुढच्या दिवशी याग करावा असे जे सांगितले आहे, त्याला योग्य काळ मिळतो; पण पर्वाचा जर खंड असेल, तर पर्वापेक्षा प्रतिपदेचा र्हास व वृद्धि यांच्या घटका मोजून, त्यांच्या निम्या घटका जर क्षय असेल, तर त्या पर्वात कमी कराव्या आणि जर वृद्धि असेल, तर त्या पर्वात मिळवाव्या. त्यावरून संधिकाल जाणून, अन्वाधानादिकांचा निर्णय करावा. जेव्हा क्षय अथवा वृद्धि ही नसतील तेव्हा जो असेल तो संधि स्पष्टच समजतो. संधीचे जे चार भाग आहेत ते असे-
१. पूर्वाह्नसंधि
२. मध्याह्नसंधि
३. अपराह्णसंधि आणि,
४. रात्रिसंधि.
दिवसाचे बरोबर दोन भाग केले असता जो पहिला होतो, तो पूर्वाह्ण व दुसरा अपराह्ण. पूर्वाह्णाची शेवटची एक घटका आणि अपराह्णाची पहिली एक घटका मिळून दोन घटकांचा म्हणजे जो एका मुहूर्ताचा वेळ तोच मध्याह्न. यालाच आवर्तन असे कौस्तुभात दुसरे नाव आहे. जो संधि फक्त एक पळभर असतो तोच मध्याह्नसंधि. दोन घटकांपर्यंत असणारा जो मध्याह्नसंधि नव्हे, असा सध्या तरी निदान शिष्टलोक याचा अर्थ समजतात. वर लिहिलेल्या रीतीने क्षय अथवा वृद्धि असतील त्याप्रमाणे (घटका) मिळवाव्या अथवा कमी कराव्या, आणि त्यावरून पर्व किंवा प्रतिपदा यांच्या संधीचा निर्णय करावा. हा संधि जर पूर्वाह्नी अथवा मध्याह्नी होईल, तर त्या संधिदिवसाच्या आदल्या दिवशी अन्वाधान करावे, आणि संधि होणार्या दिवशी याग करावा. अपराह्णी अथवा रात्री जर संधि होत असेल तर, संधिदिवशी अन्वाधान करून, त्याच्या पुढच्या दिवशी याग करावा. याचे उदाहरण असे - पर्व १७ घ. प्रतिपदा ११ घ. प्रतिपदेचा क्षय ६.घ. यातला अर्धा भाग म्हणजे ३ घ. पर्वात कमी केल्या म्हणजे १४ घटकांचा संधि होतो. दिनमान ३० घटकांचे असताना हा पूर्वाह्नसंधि होईल आणि हाच संधि दिनमान २८ घटकांचे असताना मध्याह्नींचा होईल. अशा प्रसंगी संधीच्या दिवशी याग करून, त्याच्या आदल्या दिवशी अन्वाधान करावे. पर्व १४ घ. प्रतिपदा १९ घ. वृद्धि ५ घ. २॥ घटका पर्वामध्ये मिळविल्या म्हणजे जो संधि होतो, तो १६ ॥ घटकांचा अपराह्नसंधि होय. अशा प्रसंगी संधीच्या दिवशी अन्वाधान करून, दुसर्या दिवशी याग करावा.