रंभाव्रत म्हणजे जे कदलीव्रत, त्याला पूर्वविद्धा तृतीया असेल ती घ्यावी. इतर व्रताकरिता तीन मुहूर्तपर्यंत द्वितीयेने विद्ध झालेली दुसर्या दिवसाची जी त्रिमुहूर्तव्यापिनी तिथि ती घ्यावी. पहिल्या दिवशी जर तीन मुहूर्ताहून कमी असा द्वितीयेचा वेध असेल आणि दुसर्या दिवशी जर तीन मुहूर्त व्याप्ति नसेल, तर पहिलीच ग्राह्य होय. पहिल्या दिवशी तीन मुहूर्त वेध असून, दुसर्या दिवशी जरी तीन मुहूर्ताहून कमी वेध असला, तरी दुसरीच घ्यावी. गौरी व्रतासंबंधाने- कला घटिका वगैरे थोडा वेळ जरी तृतीया असली, तरी तीच ग्राह्य आहे. दिनक्षय असल्यामुळे दुसर्या दिवशी चतुर्थीयुक्त तृतीया थोडीहि जरी मिळाली नाही, आणि आदल्या दिवशीची द्वितीया जरी विद्ध असली, तरी मग ती विद्धा द्वितीयाच ग्राह्य होय. दिनवृद्धीमुळे आदल्या दिवशी तृतीया साठ घटका असून, दुसर्या दिवशी जर काही घटका उरलेली असेल, तर आदल्या दिवसांची साठ घटकांची तृतीया सोडून, दुसरी जी चतुर्थीयुक्त तीच गौरीव्रताला ग्राह्य आहे. येथे नववा उद्देश संपला.