ज्यांना विशेष कळत नाही अशा अज्ञानी लोकांसाठी, आता दुसरा प्रकार सांगतो. सूर्योदयानंतर पर्वाच्या जेवढ्या घटका असतील आणि प्रतिपदेच्या जेवढ्या असतील त्यांची एकत्र बेरीज करून, त्या जर दिनमानाहून कमी आलय तर तो पूर्वाह्णसंधि, दिनमानाइतक्याच आल्या, तर तो मध्याह्नसंधि, आणि दिनमानापेक्षा जर जास्त आल्या, तर तो अपराह्णसंधि समजावा. याप्रमाणे सुर्योदयानंतर असणार्या या पर्व आणि प्रतिपदा यांच्या क्षयवृद्धीनी संधिकाल ठरविण्याचा सध्या सर्वत्र प्रघात पडला आहे. चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी गेलेल्या पर्वाच्या घटका आणि सूर्योदयानंतरच्या घटका यांची बेरीज करावी; त्याचप्रमाणे प्रतिपदेच्या आदल्या दिवसाच्या व पुढच्या दिवसाच्या घटका यांची बेरीज करावी, आणि त्यावरून पर्वापेक्षा प्रतिपदेची वृद्धि किंवा क्षय ही समजावीत. याचे उदाहरण असेः चतुर्दशी २२ घ., पर्व १७ घ., चतुर्दशीच्या दिवशी पर्व ३८ घ., पुढच्या दिवशी १७ घ., या दोन्ही मिळविल्या असता, ५५ घ. होतात. त्याचप्रमाणे पर्वाच्या दिवशी प्रतिपदेच्या घ. ४३ व दुसर्या दिवशी ११ घ. मिळून ५४ घ. होतात. येथे १ घ. प्रतिपदेचा क्षय आहे. त्याचा अर्धा म्हणजे अर्धी घटका पर्वातून कमी केली असता जो संधि होतो, तो १६॥ घटकांचा अपराह्णसंधि होय. पहिल्या मताप्रमाणे हा पूर्वाह्णसंधि होतो. उदाहरण दुसरेः - चतुर्दशी २४ घ., पर्व १७ घ. आणि गत घति ३६; पुढे येणार्या घटिका मिळवून ५३ झाल्या. प्रतिपदा ११ घटि गेलेल्या आणि येणार्या घटकांची जी बेरीज झाली ती ५४ घ. झाली. पूर्वी सांगितलेल्या रीतीने क्षयाच्या उदाहरणात १ घ.जी वृद्धि, तिचा अर्ध मिळविला म्हणजे १७॥ घटकांचा अपराह्णसंधि होतो. याप्रमाणे पहिले मत व हे मत यात फार मोठा विरोध आहे, आणि वृद्धि, क्षय वगैरे सर्व काही विपरीत आहे. या मताप्रमाणे वृद्धि किंवा क्षय ही दोन घटकांहून अधिक होत नाहीत. 'दुसर्या दिवशी जितक्या घटका कमी अथवा अधिक' असे जे घटकांचे बहुवचन केले आहे, ते सुसंगत नाही. या प्रकारासंबंधाने हे जे दूषण पुरुषार्थचिंतामणीत सांगितले आहे, ते पाहावे.