सामवेदीयांच्या इष्टीविषयी सर्वसाधारण अशी पौणिमा तिथि पूर्वी सांगितली. अमावास्येला रात्रिसंधि असताना, चंद्रदर्शन असताही प्रतिपदेलाच याग करावा. अपराह्णसंधि असताना प्रातःकाली सहा घटकांनी परिमित अशा प्रतिपदेच्या पहिल्या तीन चरणांत जर योग्य असा यज्ञकाल येत असेल, तर चंद्रदर्शन असताही प्रतिपदेलाच इष्टि करावी व संधिदिवशी उपास आणि पितृयज्ञ ही करावीत. योग्यकालाचा जर संभव नसेल, तर संधिदिवशी याग करून, त्याच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला पितृयज्ञ आणि उपास ही करावीत. याप्रमाणेच सामवेद्यांनीही कात्यायनाप्रमाणेच चंद्रदर्शनाचा निषेध यथासंभव पाळावा. याप्रमाणे सामवेद्यासंबंधाच्या निर्णयाचा बाविसावा उद्देश येथे संपला.