आधान जे करणे ते, उक्त नक्षत्री व पर्वदिवशी करावे. त्या कृत्यास जे पर्व घेणे ते संकल्पापासून पूर्णाहुतिपर्यंतचा सर्व प्रयोज ज्या कालात होईल असे घ्यावे. इतका काल पुरणारे जे पर्व नसेल, तर गार्हपत्याधानापासून आहवनीयाधानापर्यंत पुरेल असे जे असेल ते घ्यावे. याचप्रमाणे नक्षत्राचाही निर्णय जाणावा. संकल्पादिक सर्व कर्म पुरे होईल इतके पर्व जर दोन दिवस असेल, तर ज्या दिवशी सांगितलेल्या नक्षत्राचा योग असेल ते घ्यावे. वसंत ऋतु, पर्व आणि सांगितलेलि नक्षत्रे या तिहींचा जर एकाच वेळी योग येईल तर फारच उत्तम. पर्व आणि नक्षत्र असून जर ऋतु नसेल, तर मध्यम योग जाणावा. केवळ नक्षत्र अथवा फक्त पर्व असणे हा वाईट योग होय. या कृत्यासाठी आश्वलायनसूत्रांत कृत्तिका, रोहिणी, विशाखा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, मृग व उत्तराभाद्रपदा अशी सात नक्षत्रे सांगितली आहेत. याशिवाय दुसर्या सूत्रांत कृत्तिका, रोहिणी, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, मृग, पुनर्वसु, पुष्य, पूर्वाफाल्गुनी, पूर्वाषाढा, हस्त, चित्रा, विशाखा, अनुराधा, श्रवण, ज्येष्ठ व रेवती-अशी सतरा नक्षत्रे सांगितली आहेत. आधान जर सोमपूर्वक असेल तर ऋतु, नक्षत्र वगैरेंचा विचार करू नये असे वचन आहे; यास्तव सोमकालाच्याच अनुरोधाने आधान करावे. तेथे निराळ्या काळाचा विचार करणे नलगे. याप्रमाणे येथे आधनकालनिर्णयाचा तिसावा उद्देश संपला.