स्वतःच्या जन्मराशीपासून - तिसर्या, सहाव्या, अकराव्या आणि दहाव्या राशीवर झालेले ग्रहण शुभकारक होय. दुसर्या सातव्या, नवव्या आणि पाचव्या- यावर झालेले मध्यम होय. जन्म अथवा तनुस्थान, चौथे, स्नान, आठवे स्थान आणि दहावे स्थान- या राशीवर झालेले अशुभ फलाचे होय. ज्याच्या जन्मराशीवर अथवा जन्मनक्षत्रावर ग्रहण होते, त्याला ते विशेष हानिकारक असते, म्हणून त्याने गर्गादिकांनी सांगितलेली शान्ति करावी. अथवा बिंबदान करावे. बिंबदानाचा प्रकार असा- चंद्रग्रहण असल्यास रुप्याचे चंद्रबिंब व सोन्याचे नागबिंब आणि सूर्यग्रहण असल्यास, सोन्याचे सूर्यबिंब व सोन्याचेच नागबिंब करून, ते तुपाने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात किंवा काश्याच्या भांड्यात ठेवून- तीळ, वस्त्र, दक्षिणा वगैरे साहित्य तयार करून,
'ममजन्मराशिजन्मनक्षत्र स्थितामुकग्रहणसूचित सर्वानिष्टप्रशान्तिपूर्वकं एकादशस्थानस्थितग्रहणसूचित शुभ फलावाप्तये बिंबदान करिष्ये'
असा संकल्प करून, चंद्र, सूर्य व राहू यांचे ध्यान करून त्यांना नमस्कार करावा, आणि नंतर
'तमोमय महाभीम सोमसूर्यविमर्दन । हेमताराप्रदानेन ममशान्तिप्रदोभव । विधुंतुद नमस्तुभ्यं सिंहिकानंदनाच्युत । दानेनानेन नागस्य रक्ष मा वेधजाद्भयात् ।'
असा मंत्र उच्चारून,
'इदं सौवर्णं राहुबिंब नागं सौवर्णं रविबिंब राजतं चंद्रबिंबं वा घृतपूर्णकांस्यपात्रनिहितं यथाशक्ति तिलवस्त्र दक्षिणासहितं ग्रहणसूचितारिष्टविनाशार्थ शुभफलप्राप्त्यर्थं च तुभ्यमहं संप्रददे ।'
या दान देण्याच्या वाक्याने, आधी पूजा केलेल्या ब्राह्मणाला त्याचे दान द्यावे. (बिंब म्हणजे प्रतिमा). यालाच अनुसरून चौथ्या वगैरे अनिष्ट स्थानी जरी ग्रहण झाले तरी दान करावे असे मला वाटते. ज्याच्या जन्मराश्यादिकांत ग्रहण होते त्याने सूर्यबिंब अथवा चंद्रबिंब यांचे अवलोकन करू नये. इतरांनी देखील वस्त्र, पाणी वगैरेतूनच बिंब पाहावे. नुसत्या दृष्टीने पाहू नये. खग्रास चंद्रग्रहण असल्यास, द्वादशीपास्न तृतीयेपर्यंत सात दिवस कोणचेही मंगलकार्य करू नये. खग्रास सूर्यग्रहण असल्यास एकादशीपासून चतुर्थीअखेरपर्यंतचे दिवस (मंगलकार्यासाठी) वर्ज्य करावेत. खंडग्रहण असल्यास चतुर्दश्यादि तीन दिवस (मंगलकार्यार्थ) वर्ज्य करावेत. ग्रासाचे चरण जसे कमी अधिक होतील त्या अमनाने दिवसांचेही प्रमाण कमीजास्ती योजावे असे ज्योतिषग्रंथात सांगितले आहे. ग्रहणाच्याच स्थितीत जर अस्त होत असेल, तर आधीचे तीन दिवस टाकावेत. ग्रहण लागलेल्या अवस्थेतच जर उदय होईल, तर पुढचे तीन दिवस सोडावेत. अगदी खग्रास असल्यास पुढचे सहा महिनेपर्यंत, ज्या नक्षत्रावर ग्रहण झाले असेल ते नक्षत्र वर्ज्य करावे. थोडा ग्रास (पादादि) असल्यास दीड महिना वगैरे प्रमाणाने वर्ज्य करावे. पूर्वी दान करण्याचा संकल्प केलेल्या द्रव्याचे दान जर ग्रहणांत केले तर द्विगुणित होते. याप्रमाणे येथे ग्रहणनिर्णयाचा एकतिसावा उद्देश संपला.