सर्व व्रतांविषयी अष्टमी शुक्लपक्षात दुसर्या दिवसाची घ्यावी, कृष्णपक्षात पहिल्या दिवसाची घ्यावी शिवशक्तीच्या एकत्र उत्सवात कृष्णपक्षातली देखील दुसर्या दिवसाची घ्यावी शुक्लपक्षामध्ये प्रातःकालापासून मध्यान्हकालापर्यंत मुहूर्तभर जरी बुधवारी अष्टमीयोग असेल तरी बुधाष्टमी ग्राह्य समजावी. सायान्हकाली, चैत्र महिन्यात, श्रावणादि चार महिन्यांत आणि कृष्णपक्षी अशी बुधाष्टमी असेल तर ती घेऊ नये. काही लोक सर्व कृष्णाष्टमीचे दिवशी कालभैरवाचे उद्देशेकरून उपवास करतात. मार्गशीर्षातली कृष्णाष्टमी भैरवजयंती आहे. म्हणून तिच्या निर्णयाला अनुसरून सर्वत्र उपवासाला मध्यान्हकालव्यापिनी असेल ती घ्यावी. दोन दिवस मध्यान्हव्यापिनी असेल तर पूर्वीची घ्यावी. प्रदोषव्यापिनी घ्यावी असे कौस्तुभात सांगितले आहे. दोन्ही दिवशी प्रदोषव्याप्ति असेल तर दोन प्रकारच्या वाक्यांत विरोध येऊ नये यास्तव दुसरी घ्यावी. पूर्ण दिवशी फक्त प्रदोषव्याप्ति असेल आणि दुसर्या दिवशी मध्यान्हव्याप्ति असेल तर बहुशिष्टाचाराला अनुसरून प्रदोषव्यापिनी पूर्वीचीच घ्यावी. रविवार, पौर्णिमा व अमावास्या या दिवशी रात्रिभोजनाचा निषेध आणि चतुर्दशी अष्टमी या दिवशी दिवाभोजनाचा निषेध असे वचन आहे. यांत भोजनाचा निषेध मात्र पाळावा, हे काही व्रत नाही. 'निषेध हा निवृत्तिरूप असून कालमात्राची अपेक्षा करतो.' असे वचन आहे म्हणून भोजनकाली व्याप्ति असलेली अष्टमि वर्ज्य करून सप्तमीत अथवा नवमीत भोजन करावे असे मला वाटते. हे योग्य किंवा अयोग्य हा विचार सज्जनांनीच करावा. इति चतुर्दशः ॥८॥