गणेशव्रतांवाचून इतर उपवासादिकांकरिता पंचमीयुक्त घ्यावी. गौरीविनायकव्रताला मध्याह्नव्यापिनी घ्यावी. दुसर्या दिवशीच जर मध्याह्नव्यापिनी असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. दोन दिवस जर मध्याह्नव्यापिनी असेल, दोन्ही दिवशी जर मध्याह्नव्यापिनी नसेल किंवा दोन्ही दिवशी जर सारखी अथवा कमी अधिक अशी एकदेशव्यापिनी असेल, तर तृतीयायुक्त प्रशस्त असल्याने, पहिल्या दिवसाचीच घ्यावी. नागव्रताला पहिल्या दिवशी जर मध्याह्नव्यापिनी असेल तर, ती पहिलीच घ्यावी. दोन्ही दिवशी जर मध्यान्हव्यापिनी असेल किंवा नसेल, अथवा कमी अधिक असेल, तर पंचमीयुक्त असणारीच घ्यावी. संकष्टचतुर्थि जर चंद्रोदयव्यापिनी असेल तर ती घ्यावी. दुसर्या दिवशी जर चंद्रोदय व्यापिनी असेल तर ती घ्यावी. दोन्ही दिवशी जर चंद्रोदयव्यापिनी असेल, तर तृतीयायुक्त असणारीच घ्यावी. दोन्ही दिवशी जर चंद्रोदयव्यापिनी नसेल, तर दुसरी घ्यावी. याप्रमाणे येथे दहावा उद्देश संपला.