स्त्रिया आणि शूद्र दोन दिवसांहून अधिक दिवस उपास करण्याचा अधिकार नाही. स्त्रियांना त्यांच्या नवर्याच्या आज्ञेवाचून व्रते, उपास वगैरेचा अधिकार नाही. उपासाच्या आणि श्राद्धाच्या दिवशी काटक्यांनी दात घासू नयेत. पाने अथवा बारा चुळा यांनी दात धुवावेत. उपासाच्या किंवा व्रताच्या दिवशी सकाळी पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे घेऊन उत्तरेकडे तोंड करावे व व्रताचा संकल्प करावा. पुर्वी न केलेल्या व्रताचा आरंभ अथवा व्रताचे उद्यापन, या गोष्टी-गुर्वादि ग्रहांचे अस्त, वैधृति व्यतिपातादि वाईट योग, कल्याणी, मंगळवार आणि शनिवार हे क्रूर वार निषिद्ध अशा अमावास्यादि तिथि, वगैरे असता करू नयेत. याप्रमाणेच खंडा तिथीलाही व्रतारंभ अथवा व्रतोद्यापन ही करू नयेत. कारण, सूर्योदयाच्या वेळी असून मध्याह्नपर्यंत जी तिथि नसते, ती खंडा तिथि होय.' या तिथीवर व्रतारंभ आणि व्रतोद्यापन ही करू नयेत. असे सत्यव्रताचे वचन आहे. क्षमा, सत्य, दया, दान, शुद्धि, इंद्रियनिग्रह, देवपूजा, हवन, संतोष व चौर्यवर्जन- हे धर्म सर्व व्रतासंबंधाने लागू आहेत- यांच्याबद्दल जो होम करायचा, तो व्याह्रतिमंत्रांनी करावा, आणि तो काम्यव्रतासंबंधाने विशेष समजावा. ज्या देवतेसंबंधाने उपोषणव्रत असेल, त्या देवतेचा जप, ध्यान तिचे कथाश्रवण, अर्चन, नामस्मरण, कीर्तन वगैरे करावीत. उपासाच्या दिवशी अन्नाला,दृष्टीने पाहाणे, त्याचा वास घेणे, तैलाभ्यंग करणे, विडा खाणे व उटी लावणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात. ज्या स्त्रियांचे नवरे जिवंत असतील अशा स्त्रियांना, सौभाग्यव्रतात तैलाभ्यंग आणि तांबूलादि उपचार वर्ज्य नाहीत. पाणी, मूळ, फळ, दूध, अग्नीला देण्याच्या आहुति (हवि), ब्राह्मणाची इच्छा, गुरुचे वचन आणि औषध, या आठ गोष्टी व्रतभंग करणार्या नाहीत. चुकून जर व्रतभंग झाला असेल, तर तीन दिवस उपास करून, क्षौर करावे आणि पुन्हा व्रत करावे. उपास करण्याची जर अंगी शक्ति नसेल, तर त्याबद्दल एका ब्राह्मणाला जेवण, तितकेच धनादि दान, हजार गायत्रीजप अथवा बारा प्राणायाम हे त्याचे प्रायश्चित्त समजावे. आरंभिलेले व्रत पुढे चालविण्यास प्रकृति अशक्त असणार्याने, प्रतिनिधीकडून ते करवावे. मुलगा, बायको, नवरा, भाऊ, उपाध्याय किंवा मित्र हे प्रतिनिधि समजावे. या प्रतिनिधीपैकी कोणाही एकाकडून व्रत करविले असता, मूळच्या व्रतेच्छु माणसाला व त्याबरोबरच प्रतिनिधीलाही व्रताचे फळ मिळते. पुष्कळदा पाणी पिणे, विडा चघळणे व दिवसा झोप घेणे आणि स्त्रीसंग करणे यांच्यामुळे व्रतभंग होतो. स्त्रीची आठवण करणे, तिच्या गोष्टी बोलणे, तिच्याशी क्रीडा करणे, स्त्रीकडे पाहणे, स्त्रीशी गुप्तपणे भाषण करणे, संकेत करणे, निश्चय करणे आणि प्रत्यक्ष संबंध करणे असे मैथुनाचे आठ प्रकार आहेत. प्राणसंकटच जर असेल, तर अनेकदा पाणी पिण्याचा दोष नाही. कातड्यातले पाणी, गाईवाचून इतर कोणाचे दूध, मसूर, ईडनिंबू, शिंपीचा चुना वगैरे मनाला मोह पाडणार्या वस्तु, व्रति माणसाने वर्ज्य कराव्या. अश्रुपात, राग वगैरेनी व्रताचा ताबडतोब भंग होतो. परान्नभोजनाचे फळ ते घालणार्याला मिळते. तीळ व मूग यावाचून शेंगेत उत्पन्न होणारी हरभरा, उडीद वगैरे धान्य व मुळा वगैरे खारट पदार्थ आणि मीठ, मध, मांस ही व्रतात वर्ज्य करावीत. सातु, देवभात व गहू ही व्रताला योग्य होत. साळीचे तांदूळ, मूग, यव, राळे, वाटाणे वगैरे धान्य, पांढरा मुळा, सुरण वगैरे कांदे, शेंदेलोण आणि समुद्रापासून होणारे मीठ, गाईचे दही, तूप व दूध, फणस, आंबा, नारळ, हिरडा, पिंपळी, जिरे सुंठ, चिंच, रायावळे, साधे आवळे, हरपररेवडी, ही फळे, गुळावाचून उसापासून तयार केलेला कोणचाही पदार्थ- ही सर्व अतैल अशा पक्की हविष्ये जाणावीत. गाइचे ताक व म्हशीचे तूप ही देखील हविष्ये आहेत. असेही कोणी म्हणतात. जेथे व्रताचा विधि सांगितला नसेल तेथे, पांच गुंजा सोन्याची अथवा रुप्याची प्रतिमा करून, तिची पूजा करावी. जेथे पदार्थ (द्रव्य) सांगितला नसेल तेथे तुपाचा होम करावा. देवता सांगितली नसल्यास प्रजापति देवता समजावी. मंत्र सांगितले नसल्यास समस्त व्याह्रतिमंत्र योजावेत. होमाची संख्या जेथे सांगितली नसेल तेथे, १०८-२८ किंवा ८ संख्या समजावी. उपास केला असल्यास, त्याच्या सांगतेसाठी ब्राह्मणभोजन घालावे. उद्यापन सांगितले नसल्यास गाईचे अथवा सोन्याचे दान करावे. व्रताची सांगता ब्राह्मणाच्या भाषणाने होते. सर्व ठिकाणि दक्षिणा दिल्यावर ब्राह्मणाचे वचन घ्यावे. जो व्रतारंभ करून ते मध्येच सोडतो, तो चांडाळासारखा होय. विधवा वगैरेंनी व्रताच्या दिवशी रंगीबेरंगी वस्त्रे धारण करू नयेत; पांढरी वस्त्रेच धारण करावीत. सुतक, विटाळशीपणा व सांथ वगैरे रोग यांचा अडथळा आला असता, शारीरिक नियम स्वतः पाळावेत व पूजादि कृत्ये दुसर्याकडून करवावीत. सुतक वगैरे असताना नवीन व्रतारंभ करू नये. काम्यकर्म प्रतिनिधीकडून करवू नये; नैमित्तिक कर्मे केल्यास चालते. आरंभ केल्यानंतर काम्यकर्माला प्रतिनिधि चालत नाही. निषिद्ध पदार्थ कोठेही प्रतिनिधिस्थान योजू नये. अनेक व्रते म्हणजे एकाहून अधिक अशी एकाच काली आल्यास, दानहोमादिक जे विरुद्ध नसेल ते, क्रमाने करावे. नक्त, भोजन व उपोषण अशी जेव्हा विरुद्ध असतील, तेव्हा त्यापैकी एक आपण करून, दुसरी-मुलगा, बायको वगैरेकडून करवावीत. चतुर्दशी, अष्टमी वगैरे दिवशी, दिवसा जेवणाचा निषेध असता, दुसर्या व्रताची जर पारणा येईल तर, पारणाविधि योग्य असल्याने भोजन करावे. कारण, भोजनाचा जो विधि सांगितला आहे, तो विधिप्राप्त नसून, रागप्राप्त आहे. रविवारी संकष्टी चतुर्थी आल्यास रात्री भोजन करावे. अष्टमी म्हणून दिवसा जेवणाचा निषेध आणि रविवार म्हणून रात्री भोजनाचा निषेध, असा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा काहीतरी थोडे खाऊन उपास करावा. चांद्रायणव्रतात एकादश्यादिकांची उपोषणे आल्यास, ग्रामसंख्येच्या नियमाप्रमाणे भोजनच करावे. कृच्छ्रादि व्रताविषयीही हाच नियम जाणावा. एका दिवसाआड करायच्या (एकांतरोपवासव्रत) उपासाचे पारणे एकादशीला जर आले तर, पाणी पिण्याचे पारणे करून उपास करावा. एकादशी वगैरे तिथीवर संक्रांति आल्यास, मुलगा असलेल्या गृहस्थाला संक्रांतीच्या उपासाचा निषेध आणि एकादशीचा उपास करणे योग्य आहे, यास्तव त्याने थोडे पाणी, थोडी फळे, थोडे दूध व थोडी मुळे यांचे सेवन करावे. दोन उपास, दोन नक्ते अथवा दोन एकभुक्ते एकाच दिवशी आल्यास 'दोन्ही एकतंत्राने करतो' असा संकल्प करून, उपास, पूजा, होम वगैरेंचे अनुष्ठान करावे. उपास आणि एकभुक्त ही एकाच दिवशी आल्यास, ती तिथि जर द्विधा असेल, ज्या तिथीला ज्या कर्माबद्दल गौणकाल असेल ते आदल्या दिवशी करून, त्या दिवशी दुसरे कर्म करावे. तिथि जर अखंड असेल तर, एक कर्म स्वतः करून दुसरे मुलाकडून करवावे. 'काम्यकर्म नित्यकर्माचे बाधक होते' वगैरे सारखी जी वाक्ये आहेत, त्यावरून दोघांचे बलाबल, बाधाबाध, संभवासंभव वगैरेंचा विचार करून अनुष्ठान करावे. याप्रमाणे येथे सहावा उद्देश संपला.