पौर्णिमा आणि अमावास्या या तिथि सावित्रीव्रताखेरीज इतर व्रतांना दुसर्या दिवसाच्या घ्याव्या. कुलधर्माकरिता जी पौर्णिमा लागते ती श्रावण आणि फाल्गुन या महिन्यांतली पूर्वविद्धा घ्यावी असे सांगितले असल्यामुळे, काहींचे असे म्हणणे आहे की, कुलधर्मादिकांकरिता पौर्णिमा पूर्व दिवसाचीच केव्हाही घ्यावी; पण त्या बाबतीत मूळ शोधून पाहिले पाहिजे. चतुर्दशी जर अठरा घटकांहून कमी असेल तर 'चतुर्दशी अठरा घटकांनी दूषित करते.' असे वचन असल्यामुळे, चतुर्दशीच्या वेधाचा दोष येत नाही. म्हणून, अशा वेळी कुलधर्मादिकांकरिता पूर्वदिवसाचीच घ्यावी. चतुर्दशीचा वेध जर अठरा घटकांहून अधिक असेल, तर पूर्वविद्धा पौर्णिमा घेऊ नये असे मला वाटते. मंगळवार अथवा सोमवार या दिवशी जर अमावास्या आली, तर स्नानदानादिक केले असता मोठे पुण्य घडते. याप्रमाणेच आदित्यवारी येणार्या सप्तमीची आणि मंगळवारी येणार्या चतुर्थीची गोष्ट आहे. सोमवारी येणार्या अमावास्येला पिंपळाची (अश्वत्थ) पूजा वगैरे करण्याचे जे व्रत करण्यात येते, ते अपराह्णापर्यंत, एक मुहूर्तभर जरी योग असला, तरी करावे. हीच सोमवती होय. दिवसाच्या अखेरीस सहा घटकापर्यंत सायाह्नयोग असताना आणि रात्रियोग असताना हे व्रत करू नये असा शिष्टाचार आहे. संन्याशांच्या क्षौरादिक कर्मांना उदयकाळी तीन मुहूर्तपर्यंत असणारी घ्यावी. तिसर्या मुहूर्ताला जर स्पर्श होणारी नसेल, तर चतुर्दशीने युक्त असेल ती घ्यावी. तिसर्या मुहूर्ताला जर स्पर्श होणारी नसेल, तर चतुर्दशीने युक्त असेल ती घ्यावी. याप्रमाणे येथे पञ्चदशीच्या निर्णयाचा एकविसावा उद्देश संपला.