एकादशीचे व्रत हे जयन्तीच्या व्रताप्रमाणे काम्य व नित्य आहे.यात अरुणोदयवेध आणि सूर्योदयवेध असे दोन प्रकारचे वेध आहेत. वैष्णव आणि स्मार्त यांचे दशमीचे दोन वेध अनुक्रमे सांगितले आहेत. वैष्णवांना विद्धा त्याज्य आहे आणि आधिक्यसंभवा असता शुद्धा देखील त्याज्यच होय. एकादशी अथवा द्वादशी जर अधिक असेल, तर आधीचा दिवस टाकून पुढचा दिवस घ्यावा, असा जो वैष्णवांचा निर्णय आहे, त्याचा अर्थ असा की, हे एकादशीव्रत केले नसता दोष सांगितला असल्याने, आणि याचे फल नित्य व संपत्ति वगैरे सांगितले आहे म्हणून, हे काम्य असे जे एकादशीचे व्रत; ते जयन्तीच्या व्रताप्रमाणे दोन्ही प्रकारचे आहे. एकादशीला दशमीचे जे एक अरुणोदयवेध आणि दुसरा सूर्योदय वेध असे दोन वेध होतात, ते अनुक्रमे वैष्णव आणि स्मार्त यांचे असतात. यावरून अरुणोदयवेध तो वैष्णवांचा आणि सूर्योदयवेध तो स्मार्तांचा असे जाणावे. जो ५६ घटकांनी परिमित वेध असतो, तो अरुणोदय समजावा. सूर्योदय तर स्पष्टच आहे. वैष्णवत्व किंवा स्मार्तत्व या गोष्टी आपापल्या परंपरेलाच अनुसरून वृद्ध लोक मानतात, आणि म्हणूनच त्या ग्राह्य होत. वैष्णवाने अरुणोदयी वेध असलेली विद्धा एकादशी सोडावी आणि द्वादशीला उपास करावा. एकादशी व द्वादशी या दोहीचे जर आधिक्य असेल, आणि ते जर सूर्योदयानंतर असेल, तर शुद्धा देखील सोडून देऊन दुसर्या दिवशी उपास करावा. फक्त एकादशीचेच जर आधिक्य असेल, तर शुद्ध असलेला असा जो आधींचा दिवस तोही टाकून पुढचाच घ्यावा. त्याचप्रमाणे केवळ द्वादशीचेच जर आधिक्य असेल, तर पहिला दिवस सोडून द्यावा आणि दुसरा घ्यावा. हा वैष्णवनिर्णय झाला. आता स्मार्तनिर्णय सांगतो. 'एकादशी आणि द्वादशी या दोहींचीही जर वृद्धि असेल, तर स्मार्तांनी पहिल्या दिवसाचा त्याग करून, दुसरा दिवस घ्यावा. केवळ एकादशीचीच जर वृद्धि असली, तर गृहस्थांनी पहिल्या दिवशी उपास करावा, आणि संन्याशांनी तो दुसर्या दिवशी करावा, असा गृहस्थ आणि यति यांच्या बाबतीत निर्णय आहे. द्वादशीचीच जर केवळ वृद्धि असेल, तर पहिली शुद्धा आणि दुसरी विद्धा अशी शुद्धा व विद्धा यांची व्यवस्था समजावी. असा हा स्मार्तनिर्णय आहे.' याचा अर्थ असा की, एकादशी व द्वादशी यांची जेव्हा वृद्धि असते, म्हणजे या तिथि जेव्हा सूर्योदयानंतर असतात, तेव्हा आधीच्या दिवसाची एकादशी जरी शुद्धा असते, तरी ती स्मार्तांनी पाळू नये; दुसर्या दिवशीच उपास करावा. जेव्हा फक्त एकादशीचीच वृद्धि असते, तेव्हा स्मार्त गृहस्थांनी पहिल्या दिवशी उपास करावा आणि संन्याशी वगैरेनी तो दुसर्या दिवशी करावा. फक्त द्वादशीच वृद्धि असेल, तर द्वादशीलाच उपास करावा. शुद्धा आणि विद्धा यांची अशी व्यवस्था आहे. याप्रमाणे दोन्ही तिथींचे आधिक्य असता आणि याचप्रमाणे केवळ द्वादशीचेच आधिक्य असताना मात्र स्मार्तांनी विद्धा एकादशीचा त्याग करावा; इतर वेळी करू नये. याप्रमाणे येथे स्मार्तनिर्णय संपला.