भाद्रपद कृष्ण अमावास्येला कन्यासंक्रांति आली आहे असे समजा; नंतर अधिक आश्विन महिना आला. त्यानंतर शुद्ध आश्विनातल्या शुद्ध प्रतिपदेस तूळसंक्रांत, कार्तिक शुद्ध प्रतिपदेला वृश्चिकसंक्रांत, त्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला धनु आणि त्याच महिन्यात अमावायेला मकरसंक्रांती आल्या असता, धनु व मकर अशा दोन्ही संक्रांतींनी युक्त जो एक महिना, त्याला क्षयमास असे म्हणतात. हा मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांचा मिळून एक महिना होतो. या क्षयमासात ज्या प्रतिपदादिक तिथि येतात, त्यांचे पूर्वार्ध मार्गशीर्ष महिन्यातले व उत्तरार्ध पौष महिन्यातले समजावे. याप्रमाणे प्रत्येक तिथि दोन महिन्यातली असते. या महिन्यातल्या तिथीच्या पूर्वार्धात मेलेल्यांचे श्राद्ध पौष महिन्यात करीत जावे. कोणी जन्म पावले असल्यास त्याच्या वाढदिवसाचा विधिदेखील याच प्रकाराने करावा. क्षयमासानंतर माघातल्या अमावास्येला कुंभसंक्रांत, नंतर अधिक फाल्गुन मास आणि शुद्ध फाल्गुनातल्या शुद्ध प्रतिपदेला मीन संक्रान्त येईल. याप्रमाणे आधी एक व मागून एक अशा दोन अधिक महिन्यांच्या मध्ये क्षयमास येतो. अशा क्षयमासयुक्त वर्षाचे तेरा महिने असून, त्या वर्षाचे दिवस दोनशे नव्वदाहून काही कमी असतात. क्षयमासाच्या आधीच्या अधिक महिन्याला संसर्प असे नाव आहे. तो सर्व कर्मांना योग्य असल्याने शुभकार्याकरिता त्याज्य नाही. क्षयमासाला अंहस्पति अशी संज्ञा आहे. क्षयमास व त्याच्यानंतर येणारा अधिक मास हे सर्व कर्मांना वर्ज्य आहेत. याचप्रमाणे प्रत्येक तीन वर्षांनी येणारा अधिक महिनाही वर्ज्य होय.